‘आधार’द्वारे अनाथ बालकेही रेकॉर्डवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:58 PM2019-07-27T23:58:49+5:302019-07-27T23:59:08+5:30
नाशिक : राज्यभरातील अनाथ बालकांसह विविध कारणांनी बालगृहात दाखल झालेल्या मुलांचे आधार तयार करून त्यांना रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न असून, ...
नाशिक : राज्यभरातील अनाथ बालकांसह विविध कारणांनी बालगृहात दाखल झालेल्या मुलांचे आधार तयार करून त्यांना रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न असून, यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (यूआयडीएआय) आयोगाने प्रस्ताव सादर केल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी दिली.
बालहक्कांविषयीच्या समस्यांचा आढावा व त्यावरील उपाययोजनांची पडताळणीसाठी बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी शनिवारी (दि.२७) नाशिकमधील बाल कल्याण समितीकडून जिल्ह्यातील स्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रवीण घुगे म्हणाले, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदे अस्तित्वात असले तरी विविध कायद्यांमुळेही या प्रक्रियेत अडचणी येतात. त्यासोबतच मतिमंद मुले, अनाथ मुले, बालकामगार यांच्या समस्या वेगवेगळ्या आहे. त्यांच्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असून, बालहक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासोबतच बालहक्क जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज असून, अशा संस्थांनी सामाजिक भावनेतून बालहक्क जोपासण्यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
भीक देणारेही गुन्हेगारच
बालहक्क आयोगासमोर रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान आहे. अनेकदा मुलांचे पालकच त्यांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करतात. भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार भीक मागणाºया इतकाच भीक देणारा आणि भीक मागण्यास प्रवृत्त करणाराही गुन्हेगार असतो. याबाबत कारवाईची गरजही घुगे यांनी व्यक्त केली.