नाशकातील गजरा विक्रेता निघाला उस्मानाबादचा दरोडेखोर; कळममध्ये वॉचमनची केली होती हत्या...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 02:51 PM2021-07-17T14:51:24+5:302021-07-17T14:58:19+5:30
५जून २०२१ साली कळम भागातील एका दरोड्यादरम्यान, वॉचमनची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कळम पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम पोलीस ठाणे हद्दीत मागील महिन्यात एका दरोड्यादरम्यान, तेथील वॉचमनला संशयित दरोडेखोरांनी ठार मारुन पलायन केल्याची घटना घडली होती. तेथील पोलिसांनी संशयावरुन शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्यात येऊन येथील पोलिसांना माहिती दिली. या माहिती व संशयिताच्या वर्णनावरुन पोलिसांनी तपास सुरु केला असता नंदीनी नदीकाठालगत खुनाच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या.
कळम तालुक्यातील बहुतांश भटके लोक शहरात येऊन गजरा, कचरा संकलनाच्या पिशव्या विक्रीचा हातावरचा व्यवसाय करताना विविध सिग्नल व वर्दळीच्या चौकांमध्ये नजरेस पडतात. ५जून २०२१ साली कळम भागातील एका दरोड्यादरम्यान, वॉचमनची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कळम पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक शहरात मोठ्या संख्येने कळमचे भटके गजरा विक्रेते वास्तव्यास असल्याचे समजले. यानंतर एका पथकाने शहरात दाखल होऊन मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांची गुरुवारी (दि.१५) भेट घेतली. त्यांना गुन्ह्यासंबंधी आवश्यक ती सर्व माहिती आणि संशयित आरोपींचे वर्णनही कळम पोलिसांच्या पथकाने दिले. यानंतर पथक माघारी गेले. ढमाळ यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाला याबाबत तपासाचे आदेश दिले.
दरम्यान, द्वारका ते मुंबईनाक्यापर्यंत महामार्ग परिसरात गजराविक्री करणाऱ्या कुटुंबियांची चौकशी पोलिसांनी सुरु केली. तसेच साध्या वेशात संशयित कुटुंबियांवर पाळत पोलिसांकडून ठेवण्यात येत होती. संशयित सुनील नाना काळे (२७, रा. मुंबईनाका सर्कल, मुळ, रा. तेर, पारधी पेढी, ता. कळम) गुन्हेगार आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता काळे याने कळमच्या गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासाकरिता त्यास कळम पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.