मनपा कर्मचारी अन्य कामात; वसुलीवर परिणाम
By admin | Published: August 1, 2016 01:00 AM2016-08-01T01:00:17+5:302016-08-01T01:02:27+5:30
पदवीधर निवडणूक : १२० कर्मचारी नियुक्त
नाशिक : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कामासाठी बीएओ म्हणून जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी विभागांतील १२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने गेल्या तीन महिन्यांपासून मनपाचे करवसुलीचे कामकाज ठप्प झाले आहे. प्रामुख्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर त्याचा परिणाम झाला आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार असून, त्यासाठी मतदार नाव नोंदणीचे काम सुरू आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने बीएलओंची नियुक्ती केली आहे. त्यात महापालिकेतील घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील सुमारे १२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती १५ जुलैपर्यंत होती. परंतु ती ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. प्रत्यक्ष वसुली करणारेच कर्मचारी उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. मागील वर्षी महापालिकेने १ एप्रिल ते २८ जुलै २०१५ या कालावधीत ३८ कोटी ९८ लाख रुपये घरपट्टी वसूल केली होती. परंतु यंदा चार महिन्यात २७ कोटी ५६ लाख रुपयेच वसुली होऊ शकली आहे, तर मागील वर्षी महापालिकेने आठ कोटी सात लाख रुपये पाणीपट्टी वसूल केली होती, यंदा ती केवळ पाच कोटी ८८ लाख रुपयेच वसूल होऊ शकली आहे. शहरात करवसुलीसाठी २११ ब्लॉक असून, त्यासाठी ११९ कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु सदर सर्वच कर्मचारी हे निवडणूक कामात व्यस्त असल्याने मनपाच्या करवसुली विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. (प्रतिनिधी)