कांदाप्रश्नी छगन भुजबळ संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:33 AM2018-12-01T01:33:08+5:302018-12-01T01:33:25+5:30
कांद्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना बदलून ती चुकीची छापल्याने भुजबळ यांनी शुक्रवारी विधानसभेत तीव्र स्वरूपात संताप व्यक्त करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
नाशिक : कांद्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना बदलून ती चुकीची छापल्याने भुजबळ यांनी शुक्रवारी विधानसभेत तीव्र स्वरूपात संताप व्यक्त करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालादिल झाले असल्याची लक्षवेधी भुजबळ यांनी दिली होती. पण छापील लक्षवेधीत उन्हाळी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, दरवाढ नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याने भुजबळांनी रुद्रावतार धारण केल्याने सभागृहात गोंधळ उडाला. यावेळी भुजबळ म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याबाबत लक्षवेधी सूचना मांडली असताना प्रशासनाकडून कांद्याची चुकीची लक्षवेधी सूचना छापली. लक्षवेधीचा अर्थच बदलला असल्याने मतदारसंघात लोक जोड्याने मारतील, अशा शब्दात भुजबळ यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, कांद्याचे दर घसरले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. ते आम्ही लक्षवेधी सूचनेत मांडले आहे. शेतकºयांना मदत करावी अशा आमच्या मागणीचा मात्र लक्षवेधीत तसा उल्लेख नाही. कांद्याला योग्य दर देण्यात यावे, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. एक किलो कांद्याला आठ रुपये खर्च येत असताना शेतकºयाला किलोला केवळ एक रुपया भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग अधिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना योग्य भाव द्यावा, अशी मागणी केली.
छगन भुजबळ यांनी सभागृहात हे प्रकरण लावून धरल्यानंतर यावेळी आमदार जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, श्शिकांत पाटील यांनी जाणीवपूर्वक कुणी लक्षवेधी बदलली असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांद्याला केवळ एक रुपया किलो दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून, शेतकरी कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन करत आहे. तसेच एका शेतकºयाने कांदा विकून आलेली रक्कम थेट पंतप्रधानांना मनी आॅर्डर करून संताप व्यक्त केला आहे.
- छगन भुजबळ, आमदार, येवला