..तर भारतीय राष्ट्रवाद फॅसिझमकडे
By admin | Published: February 15, 2015 10:47 PM2015-02-15T22:47:34+5:302015-02-15T22:47:54+5:30
रावसाहेब कसबे : लोणारवाडी येथे छात्रभारतीचा मेळावा
सिन्नर : भारतीय माणसाची भारतीय ही ओळख प्रदेश, भाषा, धर्म, जात, उपजात अशा अनेक गोष्टींमध्ये विखुरली आहे. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि इहवादावर विश्वास असणाऱ्या चळवळींनी जर त्याला भारतीय ओळख दिली नाही, तर भारतीय राष्ट्रवाद फॅसिझमकडे जाण्याची शक्यता आहे, असा इशारा ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिली.
लोणारवाडी येथील युवामित्र संस्थेत शनिवारी आयोजित छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कसबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वैदू समाजाच्या जात पंचायतीविरुद्ध यशस्वी लढा देणाऱ्या दुर्गा गुडेलू यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर विलास किरोते, युवामित्रचे अध्यक्ष सुनील पोटे उपस्थित होते.
जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरण विशिष्ट वर्गाच्याच हाती राहिल्याने त्यातून थोड्या समाजाचे हितसंबंध जोपासले जात आहेत, यामुळे देशात सर्व क्षेत्रात विषमता वाढत असल्याचे कसबे म्हणाले. या परिस्थितीला रोखण्यासाठी आणि समानतावादी विचार रुजण्यासाठी अधिक तयारी डाव्या चळवळींनी कार्यरत होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आत्ताच्या काळात कोणत्याही स्थानिक घटनेला जागतिक संदर्भ असतात. प्रत्येक घटनेचे विश्लेषण जागतिक संदर्भातच केले पाहिजे, अशा शब्दांत कसबे यांनी कार्यकर्त्यांना आत्मभानाची जाणीव करून दिली. धर्मचिकित्सा टाळून आत्मभान येत नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी गुडेलू यांनी वयाच्या १३ वर्षी लिहीलेली ‘मुझे कुछ बोलना है, मगर मुझे बोलने की आदत नही...’ ही कविता सादर केली. जातपंचायती विरोधात एकाकी लढा देत असताना त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन ऐकून कार्यकर्तेही हेलावले. जात आणि जात पंचायतीविरोधातल्या लढ्यात कार्यकर्त्यांनी आपल्याला निरंतर साथ देण्याचे आवाहनही गुडेलू यांनी यावेळी केले.
दिवसभरात कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. किरोते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप काळे यांनी परिचय करून दिला. श्रीशैल्य बिराजदार यांनी आभार मानले. रविवारी ज्येष्ठ कार्यकर्ते अन्वर राजन यांच्या उपस्थितीत मेळाव्याचा समारोप झाला. (वार्ताहर)