मनपाच्या स्वच्छतेसह अन्य सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:32 AM2020-01-09T00:32:30+5:302020-01-09T00:33:26+5:30
विविध मागण्यांसाठी महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या काम बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी राजीव गांधी भवनसमोर मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली आणि त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारदेखील सहभागी झाल्याने ऐन स्वच्छ सर्वेक्षणाच्या तयारीत बाधा निर्माण झाली आणि अनेक ठिकाणी कचरा पडून होता.
नाशिक : विविध मागण्यांसाठी महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या काम बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी राजीव गांधी भवनसमोर मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली आणि त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारदेखील सहभागी झाल्याने ऐन स्वच्छ सर्वेक्षणाच्या तयारीत बाधा निर्माण झाली आणि अनेक ठिकाणी कचरा पडून होता.
या संपात सुमारे ९५ टक्के कर्मचारी सहभागी झाले असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, संघटनांनी शंभर टक्के संप यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
केंद्र शासनाच्या कथित कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात महापालिकेच्या कामगार कर्मचारी सर्व संघटना कृती समितीने संपात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सुमारे पाच हजार कर्मचारी आणि कामगार संपात सहभागी झाले होते. सिडकोसह विविध विभागीय कार्यालयांसमोर कर्मचारी जमले होते. तर सकाळी राजीव गांधी भवनसमोर जमण्याचे आवाहन करण्यात आल्याने शेकडो कर्मचाºयांनी ठाण मांडले होते. यावेळी महापालिकेशी संंबंधित विविध मागण्यांना उजाळा देण्यात आला. विशेषत: महापालिकेने सेल्फी हजेरी रद्द करावी, रिक्त पदे त्वरित भरावी, सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवरच महापालिकेत सातवा वेतन आयोग द्यावा, पदोन्नतीची कार्यवाही त्वरित करावी अशाप्रकारच्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. डॉ. डी. एल. कराड, प्रवीण तिदमे, गजानन शेलार, गुरुमितसिंग बग्गा, सुरेश मारू, सुरेश दलोड, राजेंद्र मोरे, प्रकाश आहिरे महादेव खुडे, मुकेश शेवाळे, अनिल बहोत, ताराचंद पवार यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे पाटील यांना निवेदन दिले.
दरम्यान, या संपात सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. पाणीपुरवठा, अग्निशमन दल, आरोग्य व रुग्णालय, सुरक्षा विभाग अशा सर्वच विभागांना संपातून वगळण्यात आले असल्याचे कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असले तरी सफाई कामगार संपात सहभागी झाले होते. तर दुसरीकडे घंटागाडी कामगारदेखील सहभागी झाल्याने अनेक भागात घंटागाड्या आल्या नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. नगररचना, घरपट्टी, पाणीपट्टीसह अन्य नागरिकांशी संबंधित सेवा ठप्प झाल्या होत्या. राजीव गांधी भवनात तर दुपारी कर्मचाºयांप्रमाणेच अधिकारीदेखील गायब होते. त्यामुळे मुख्यालयात सुट्टी असल्याचे वातावरण होते.
निवेदन स्वीकृतीसाठीही कर्मचारी नाही
कामगार संघटनांनी उपआयुक्त मनोज घोडे पाटील यांना निवेदन दिले. त्याचवेळी त्यांच्याकडून प्रत स्वीकारल्याची स्वाक्षरी आणि शिक्का मागण्यात आला. त्यासाठी कर्मचारी उपलब्ध होता. परंतु त्याने आपण हजेरी लावलेली नसल्याचे सांगितल्याने मागण्यांच्या निवेदनाच्या स्वीकृतीविषयी प्रश्न निर्माण करण्यात आला. अखेरीस उपआयुक्त घोडे पाटील यांनीच स्वीकृतीची सही दिली.
सफाई कामगारांनी
काढले मोर्चे
या मोर्चात सहभागी झालेल्या सफाई कामगारांनी दोन ठिकाणांहून मोर्चे काढले. वडाळा नाका येथील वाल्मीकी मंदिरापासून वाल्मीकी समाजाने आणि रेड क्रॉस येथून मेहतर समाजाच्या सफाई कामगारांनी सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोर्चा आणून निदर्शने केली.
बायोमेट्रिकची माहिती मिळणे अशक्य
महापालिकेत किती कर्मचारी हजर आहेत आणि किती गैरहजर आहेत याची माहिती प्रशासनाला उपलब्ध होऊ शकली नाही. हजेरीसाठी महापालिकेत बायोमेट्रिक व्यवस्था असली तरी त्याबाबत संकलित माहिती वरिष्ठांना देण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.