विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील बंडखोरांचेच आव्हान औत्सुक्याचे !

By किरण अग्रवाल | Published: October 6, 2019 01:14 AM2019-10-06T01:14:49+5:302019-10-06T01:20:55+5:30

निवडणुकीचे राजकारण म्हटले की, त्यात बंडखोºया या होतच राहतात. पण, सत्ताधाऱ्यांकडून एकतर्फी निवडणुकीचे व लाटेचे चित्र दर्शविले जात असताना त्यांच्याच पक्षात बंडाळ्या करून शह देऊ पाहणारे पुढे येतात आणि संबंधित पक्षही परपक्षीय उमेदवार खांद्यावर घेताना दिसतात, तेव्हा त्यातून राजकीय बेभरवशाचीच स्थिती उघड होऊन गेल्याशिवाय राहत नाही.

Otsuki challenges the rebels in power more than the opposition! | विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील बंडखोरांचेच आव्हान औत्सुक्याचे !

विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील बंडखोरांचेच आव्हान औत्सुक्याचे !

Next
ठळक मुद्देअनुकूलतेची स्थिती असेल तर स्वकीयांना डावलून परपक्षियांचे ओझे का बाळगले जावे?भाजपचे शिस्तीचे संस्कार कमी पडलेत की काय?शिवसेनेची तर या निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच दमछाक झालेली दिसून आली

सारांश

इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आव्हानांची चिंता बाळगली जात नाही हेच खरे असल्याने, अखेर पक्षीय निर्णयांना धुडकावून लावत अनेकांनी विधानसभा निवडणुकीसाठी बंडाचे निशाण फडकावले आहे. यातील इच्छुकांचे राजकारण समजूनही घेता यावे, परंतु सत्ताधाºयांकडून लाटेच्या चर्चा आजही केल्या जात असताना त्यांच्याच पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी दिसून येत असेल तर त्या कथित लाटेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यावाचून राहू नयेत.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातही सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले. विशेषत: नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपतर्फे उपमहापौर, महापौर व नंतर आमदारकी भूषविलेल्या व मंत्रिपदाच्याही शर्यतीत धावलेल्या बाळासाहेब सानप यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सानप यांनी लोकप्रतिनिधित्व करतानाच भाजपचे शहराध्यक्षपदही निभावले आहे व त्यांच्याच नेतृत्वात नाशिक महापालिकेत या पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवता आली आहे. पक्षाध्यक्ष म्हणून कार्य करताना पक्षाला ‘अर्थ’वाही करण्यात त्यांची भूमिका मोठी राहिल्याचेही बोलले जात असताना सानप बंडखोरी करतात याचा अर्थ, भाजपचे शिस्तीचे संस्कार कमी पडलेत की काय?

महत्त्वाचे म्हणजे, सानप यांच्यासोबतच पक्षातील १६ जणांनी उमेदवारीसाठी रितसर मुलाखती दिल्या होत्या. सानप यांचे तिकीट कापताना त्यापैकी कुणासही उमेदवारी मिळाली असती तर सानप यांची बंडखोरी कदाचित टळली असती. सानप यांनी हाच मुद्दा घेऊन आता निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अर्थात, अर्ज दाखल करायच्या अखेरच्या दिवशी परपक्षातून आलेल्यास भाजपकडून उमेदवारी बहाल केली गेल्याने लाटेवर निवडून यायची भाषा करणाºया या पक्षाला स्वपक्षात निवडून आणण्यायोग्य एकही उमेदवार आढळला नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरले. पक्षाच्या पडतीच्या काळात पराभव निश्चित असूनही ‘इलेक्टिव्ह मेरीट’चा विचार न करता उमेदवारी देणारा भाजप, आज पक्ष ऐन भरात असतानाही उधार-उसनवारीच्या उमेदवारीवर निवडणुकीस सामारे जात असल्याचे पाहता, त्यातून स्वकीयांचे खच्चीकरण तर घडून यावेच, शिवाय राजकारणातील शुचिता व तत्त्वनिष्ठेच्या बाबतीत आजवर केल्या गेलेल्या ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या भूमिकेचा बुरखाही गळून पडावा.

भाजपचा सहयोगी पक्ष शिवसेनेची तर या निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच दमछाक झालेली दिसून आली आहे. एक तर ‘युती’साठी लहान भावाची भूमिका स्वीकारण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नव्हता आणि दुसरे म्हणजे ‘युती’त राहूनही काही उमेदवार निवडून येण्याचा त्यांना विश्वास नसावा. त्यामुळे इगतपुरीत त्यांनाही परपक्षीय निर्मला गावित यांच्या हाती शिवबंधन बांधावे लागले. दिंडोरीत अन्य सक्षम पर्याय उपलब्ध असतानाही, गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष सोडून राष्टÑवादीत गेलेल्या व तेथे पराभव चाखून परतलेल्या धनराज महाले यांनाच अगोदर बोहोल्यावर चढविले गेले व ते अंगाशी आल्यावर ऐनवेळी उमेदवारी बदलण्याची नामुष्की ओढवली. इमाने इतबारे पक्षकार्य करणाºयांना केवळ झेंडा धरायला लावून भलत्यांचेच भले करू पाहण्याची शिवसेनेतील अलीकडील व्यवस्था त्यामुळेच निष्ठावंतांना अस्वस्थ करणारी ठरू पाहते आहे.

नाशकातील तीनपैकी किमान एकतरी जागा ‘युती’अंतर्गत शिवसेनेला मिळावी अशी स्थानिकांची मागणी होती. पण, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने नाशिक पश्चिममध्ये बंडाळी झाली आहे. रडायचे नाही, लढायचे म्हणत सारे शिवसैनिक एकवटले असून, तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय, विधानसभेच्या तिकिटासाठी भाजपची एक नगरसेविका राष्टÑवादीत तर शिवसेनेचा एक नगरसेवक मनसेत गेला आहे. त्यामुळे सानप असोत की अन्य कुणी, यांच्या बंडखोºया भाजप उमेदवारांसाठी अडचणीच्याच ठरण्याची शक्यता नाकारता येऊ नये. यातील त्यांचा जय-पराजय हा नंतरचा विषय. मुद्दा एवढाच की, एकीकडे विजय निश्चित असल्याचा आविर्भाव बाळगणारे समोर असतानाही इतरांकडून बंडखोºया करीत मैदानात उतरण्याचे धाडस दाखविले जात असल्याचे पाहता त्यांचा आत्मविश्वास व त्यांच्याकडून दिले जाणारे आव्हान औत्सुक्याचे ठरावे. कारण विरोधी पक्षांशी द्यावी लागणारी लढत वेगळी आणि स्वकीयांशीच दोन हात करण्याची नामुष्की वेगळी असते.

Web Title: Otsuki challenges the rebels in power more than the opposition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.