‘ओतूर’ ओव्हरफ्लो
By admin | Published: August 6, 2016 10:48 PM2016-08-06T22:48:58+5:302016-08-06T22:50:29+5:30
‘ओतूर’ ओव्हरफ्लो
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर धरण गेल्या सामवारी पाण्याने पूर्णपणे भरले असून, ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आतूर परिसरातील वीस गावांना या धरणाच्या पाण्याचा फायदा होतो. या शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या धरणामध्ये यावर्षी ९७ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा झाला आहे. दररोज हजारो क्युसेस पाण्यचा विसर्ग होत असून, मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहात आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी अति पावसामुळे उपळल्या असून, शेतीतून पाणी वाहात आहे. त्यामुळे खरीपांचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे.
गेल्या रविवारी व सोमवारी पुनर्वसू नक्षत्राच्या शेवटच्या चरणात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. आता आश्लेषा नक्षत्रानेही पावसाची हजेरी लावली आहे. गेल्या चार ते पाच वर्षात ओतूर धरणात एवढे पाणी आले नव्हते. नदीकाठच्या शेतकऱ्यांना प्रशसनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सदर मार्कंडेय नदी पुढे कळवण खुर्द गावाजवळ बेहडी नदीस मिळते व पुढे त्या गिरणा नदीत विलीन होतात. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्याने त्याचा खरीप पिकांना फायदा होणार आहे.
या धरणामुळे शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बऱ्याच शेतरक्यांच्या शेतात पूरपाणी घुसल्याने शेतीचे नुकसान झाले असून, पर्यायाने पिकांचे नुकसान झाले आहे. दोन तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओतूर धरणासह परिसरातील लहान मोठी पाझर तलावही पाण्याने भरली आहेत.
या पावसामुळे आदिवासी व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच ओतूर धरण भरल्याने व नदीला पहिला पूर आल्याने पाय रस्ते वाहून गेले आहेत. डोंगर उतारावरून माती वाहून आल्याने सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. काही रस्त्याच्या साईड पट्ट्या व मातीचा भराव वाहून गेला आहे. (वार्ताहर)
नाशिक मनपाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू
नाशिक : गेल्या मंगळवारी (दि. २) शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच गोदावरीला आलेल्या महापुरामुळे ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास शुक्रवारी सुरुवात झाली. दिवसभरात सुमारे २५० पंचनामे करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका यांच्या वतीने घरांचे, दुकानांचे तसेच धान्य व इतर मालमत्ता यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे.
त्यासाठी १० पथके तैनात करण्यात आली आहेत. शिवाजीवाडी येथे २१० पंचनामे तर नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरवाडी येथे ४० पंचनामे करण्यात आले. (प्रतिनिधी)