"पालकमंत्रिपदावर आमचा दावा कायम"; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे विधान
By संकेत शुक्ला | Updated: January 25, 2025 19:07 IST2025-01-25T19:06:10+5:302025-01-25T19:07:38+5:30
लाडकी बहीण योजनेच्या निधीबद्दल कधीच बोललो नाही - मानिकराव कोकाटे

"पालकमंत्रिपदावर आमचा दावा कायम"; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे विधान
नाशिक : शेतकरी कर्जमाफीबाबत मी काहीच वक्तव्य केलेले नाही. कोणती योजना चालवायची आणि कोणती थांबवायची याचा निर्णय घ्यायला वरिष्ठ समर्थ आहेत. तो माझा विषय नाही. ज्याच्या जागा जास्त त्या पक्षातील नेत्याला पालकमंत्रिपद मिळावे, हा नियम आहे. त्यामुळे आम्ही पालकमंत्रिपदावरील दावा कायम ठेवला आहे, असे मत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.
कोकाटे यांची कृषिमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल येथील विविध क्रीडा संघटनांच्या वतीने शनिवारी (दि. २५) त्यांचा कालिकादेवी मंदिर संस्थानच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. कोकाटे म्हणाले, पालकमंत्रिपद मला मिळावे, यासंदर्भात नागरिक भाष्य करत आहेत. मी पालकमंत्री व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. पालकमंत्रिपदावरील नेता स्थानिक असेल तर त्याला नागरिकांचे प्रश्न चांगले माहिती असतात. जनतेशी त्यांचा थेट जनसंपर्क असतो. त्याला त्या-त्या जिल्ह्याची सखोल माहिती, प्रश्नांची जाण असते. त्यामुळे पालकमंत्रिपद स्थानिक नेत्यालाच मिळावे, ही अपेक्षाही योग्यच आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या जागा अधिक आहेत. या न्यायाने राष्ट्रवादीने पालकमंत्रिपदासाठी अधिकार नोंदवला असून आमचा दावा कायम असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
योजनांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठांना आहे. त्याबाबत ते वक्तव्य करतील. त्यामुळे लाडकी बहीण योजना अथवा कृषी कर्जमाफी याबाबत मी बोलणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी क्रीडा व युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये लवकरच एक बैठक आयोजित केली जाणार असून, त्यानंतर एक सर्वंकष क्रीडा धोरण करण्यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवणार असल्याची माहितीही मंत्री कोकाटे यांनी दिली.