आमुचा गाव एक, आमचे बाप्पा एक....! नाशिकमध्ये ९०६ गावांनी घेतला एक गणपती बसविण्याचा निर्णय
By अझहर शेख | Published: September 18, 2023 07:32 PM2023-09-18T19:32:08+5:302023-09-18T19:32:20+5:30
सालाबादप्रमाणे यावर्षी जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना नाशिक ग्रामिण पोलिसांकडून राबविली जात आहे.
नाशिक: शहरासह जिल्ह्यातसुद्धा सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह शीगेला आहे. नाशिक ग्रामिण पोलिस दलाने सर्व ४५ लहान-मोठ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील ९०६ गावांमध्ये एकच बाप्पा विराजमान होणार आहे. या सर्व गावांनी पोलिसांच्या हाकेला ओ देत ‘एक गाव एक गणपती’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामिण पोलिस दलाच्या नाशिक ग्रामिण, निफाड, पेठ, मालेगाव शहर- ग्रामिण, मालेगाव कॅम्प मनमाड, कळवण असे आठ विभाग आहेत. या आठ विभागात एकुण ३९ पोलीस ठाणे आहेत. तालुकानिहाय व काही गावपातळीवर पोलिस ठाणे असून या सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगने यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस निरिक्षक यांची बैठक घेत बंदोबस्ताचे नियोजन करून विविध सुचना दिल्या आहेत. गणेशोत्सवात कोठेही डीजे साउण्ड सिस्टीमचा वापर मंडळांनी करू नये, याबाबतही सूचना त्यांना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
सालाबादप्रमाणे यावर्षी जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना नाशिक ग्रामिण पोलिसांकडून राबविली जात आहे. या संकल्पनेला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे ९०६ गावांनी एकमताने निर्णय घेत ‘आमचे गाव एक, गणपती एक’ याप्रमाणे पोलिसांकडे नोंद केली आहे. जिल्ह्यातील या ९०६ गावांमध्ये सार्वजनिकरित्या एकच बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.