शहरातील १५९ झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण अत्यल्प दिलासा : स्वच्छतेच्या पालनात वाढ; प्रतिकारशक्तीही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 06:05 PM2021-01-02T18:05:16+5:302021-01-03T00:47:40+5:30
नाशिक : महानगरातील शासकीय भूखंड, मनपाच्या जागा, कॅनॉललगतच्या जागांवर झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात असून सध्या शहरात तब्बल १५९ झोपडपट्ट्या आहेत.
नाशिक : महानगरातील शासकीय भूखंड, मनपाच्या जागा, कॅनॉललगतच्या जागांवर झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात असून सध्या शहरात तब्बल १५९ झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये गतवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोनाने थैमान घातल्याने झोपडपट्ट्यांमधील रुग्णसंख्या ३ हजारांवर पोहोचली होती. मात्र, आता कोरोनाचे घटलेले प्रमाण, स्वच्छता पालनातील वाढ तसेच नागरिकांच्या प्रतिकारशक्तीतही वाढ झाल्याने झोपडपट्टी परिसरातील रुग्णसंख्या ३५७वर पोहोचली आहे.
महापालिकेच्या जागांवर अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन्ही प्रकारच्या झोपडपट्ट्या आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी महापालिका भूतदयेने रस्ता, पाणी, गटारे अशा सर्वच सुविधा दिल्या आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने नियमितपणे धुरळणी करण्यासह अन्य आरोग्यसंबंधित उपाययोजना तातडीने करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरात सध्या १५९ झोपडपट्ट्या असून, त्यातील १०२ झोपडपट्ट्या अधिकृत आहेत. तर ५७ झोपडपट्ट्या अनधिकृत आहेत. अनेक झोपडपट्टीतील रहिवाशांना घरकुल मिळूनदेखील पुन्हा त्याच ठिकाणी येणे किंवा अगोदरचे घर भाड्याने देण्याचे प्रकारदेखील घडतात. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवासी संख्या कधीच घटत नाहीत. मात्र, आरोग्य उपाययोजनांमुळे गत तीन महिन्यात झोपडपट्टी भागात कोरोनाची रुग्णसंख्या नगण्य झाली आहे. महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागाच्या वतीने झोपडपट्ट्यांचे निर्मूलन होऊ शकलेले नाही. मात्र, महापालिकेचा वैद्यकीय विभाग आणि आरोग्य विभागाने सातत्याने धुराची फवारणी, रॅपिड अँटिजेन टेस्ट, घरपोच गोळ्या अशा सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करीत कोरोनावर बहुतांश प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळेच महानगरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या हजारापेक्षा कमी आली असून, सर्व यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळेच त्यांना हे यश मिळवणे शक्य झाले आहे.
मल्हारखाण झोपडपट्टी - १३
पंचशील नगर झोपडपट्टी - ०९
भीमनगर झोपडपट्टी - १०
आम्रपाली झोपडपट्टी - ०३
फुलेनगर झोपडपट्टी - ११
-----------
जिल्ह्यातील एकूण रुग्ण - १ लाख १० हजार ३४६
उपचारांनंतर बरे झालेले रुग्ण - १ लाख ६ हजार ६३२
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - १ हजार ७४२
एकूण मृत्यू - १ हजार ९७२
झोपडपट्टी भागातील रुग्ण - ३५७