डझनभर नगरसेवक निवडणूक मैदानातून ‘आउट

By admin | Published: November 5, 2016 12:20 AM2016-11-05T00:20:39+5:302016-11-05T00:43:05+5:30

’सिन्नर : १३ नगरसेवक पुन्हा आजमवणार ‘नशीब’; थेट नगराध्यक्षाच्या आखाड्यात एक विद्यमान नगरसेवक

Out of the dozen corporators, 'Out' | डझनभर नगरसेवक निवडणूक मैदानातून ‘आउट

डझनभर नगरसेवक निवडणूक मैदानातून ‘आउट

Next

शैलेश कर्पे ल्ल सिन्नर
जिल्ह्यातील सर्वात जुनी पालिका असलेल्या व भव्यदिव्य इमारत असलेल्या सिन्नर नगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून पाय ठेवण्यासाठी तेरा विद्यमान नगरसेवक सरसावले आहेत, तर डझनभर विद्यमान नगरसेवकांनी घरी बसणे पसंत केले आहे.
बारा विद्यमान नगरसेवकांना या ना त्या कारणाने निवडणूक रिंगणातून बाहेर राहावे लागले आहे. काही विद्यमान नगरसेवकांनी स्वखुशीने थांबणे पसंत केले आहे तर काहींना आरक्षण अन् प्रभागरचनेचा फटका बसला आहे. काही विद्यमान नगरसेवकांना जनता नाकारेल या धास्तीने नेत्यांनी पुन्हा उमेदवारी दिलेली नाही.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २३ नगरसेवक जनतेतून निवडून आले होते, तर दोन नगरसेवक स्वीकृत होते. त्यामुळे गेल्यावेळी पालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांची संख्या २५ होती. यावेळी प्रभागरचना बदलली असून, १४ प्रभागांतून २८ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत, तर तीन नगरसेवक स्वीकृत असणार आहेत. त्यामुळे यावेळी पालिकेच्या सभागृहात ३१ नगरसेवक असणार आहेत.
२८ लोकनियुक्त नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेच्या निवडणुकीत यंदा अनेक बदल पाहावयास मिळणार आहेत. प्रभागरचना अन् आरक्षणामुळे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपद भूषविणाऱ्या नगरसेवकांना याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या वेळचे २५ पैकी १२ नगरसेवक कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुकीपासून लांब राहिले आहेत, तर उर्वरित १३ नगरसेवक पुन्हा आखाड्यात उतरले आहेत. त्यातील विद्यमान नगरसेवक लता मनोहर हिले यांनी थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉँग्रेस पक्षाकडून त्यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.
विद्यमान नगराध्यक्ष आश्विनी देशमुख व उपनगराध्यक्ष संजय नवसे हे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात नसले तरी पालिका निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत. उपनगराध्यक्ष संजय नवसे यांची सून राधिका रोशन नवसे निवडणूक रिंगणात आहेत.
सिन्नरचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ आहे. आमदार राजाभाऊ वाजे शिवसेनचे आमदार आहेत, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे भाजपाचे नेते आहेत. पक्षांपेक्षा वाजे गट किंवा कोकाटे समर्थक या नावानेच राजकारण तापते. आमदार वाजे यांनी शैलेश नाईक, विजया बर्डे व प्रमोद चोथवे या विद्यमान नगरसेवकांना शिवसेनेच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले आहे, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विठ्ठल उगले, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नामदेव लोंढे, नगरसेवक शीतल कानडी, उज्ज्वला खालकर, मल्लू पाबळे, बापू गोजरे या सहा विद्यमान नगरसेवकांना भाजपाकडून उमेदवारी दिली आहे.
मेहमूद दारूवाले, लता मुंडे या दोघा विद्यमान नगरसेवकांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला आहे. कॉँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक लता हिले या काँग्रेस पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाच्या मैदानात उतरल्या आहेत. स्वीकृत नगरसेवक हर्षद देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे.
शिवसेनेने २५ नवीन चेहेरे निवडणूक रिंगणात उतरवले आहेत, तर भाजपाने २२ नवीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पालिका निवडणुकीत विद्यमान १३ नगरसेवकांपैकी पुन्हा पालिकेत जाण्यासाठी जनता कोणाला संधी देते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Web Title: Out of the dozen corporators, 'Out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.