पाच हजार प्रगणकांकडून शाळाबा' मुलांचे सर्वेक्षण
By admin | Published: June 21, 2015 01:17 AM2015-06-21T01:17:14+5:302015-06-21T01:18:43+5:30
पाच हजार प्रगणकांकडून शाळाबा' मुलांचे सर्वेक्षण ४ जुलै रोजी मोहीम
नाशिक : शासनाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिका क्षेत्रात येत्या ४ जुलै रोजी शाळाबा' मुलांचे सर्वेक्षण केले जाणार असून, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये वंचितांच्या मुलांचाही शोध घेतला जाणार असून, विविध समाजसेवी संस्थांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सर्व मुला-मुलींना आठवीपर्यंतचे सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची शासनाची योजना असून, समाजातील प्रत्येकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे; परंतु अद्यापही ६ ते १४ वयोगटांतील अनेक मुले विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असून, अशा मुलांचा शोध घेण्यासाठी ४ जुलै रोजी महापालिकेच्या वतीने एकदिवसीय सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत घरोघरी जाऊन शाळाबा' मुलांची माहिती घेतली जाणार आहे. या मोहिमेकरिता महापालिका क्षेत्रातील प्रत्येक शंभर घरांकरिता एक प्रगणक नियुक्त केला जाणार असून, एकूण पाच हजार प्रगणकांची नियुक्ती केली जाईल, तर २५० पर्यवेक्षकांसह १५ नियंत्रकांचीदेखील याकामी नियुक्ती केली जाणार आहे. या सर्वांना कामाच्या जबाबदारीचे वाटप केले जाणार असून, घरोघरी सर्वेक्षणाबरोबरच बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजार, वीजभट्या, सिग्नल, बांधकाम साइट अशा विविध ठिकाणचे सर्वेक्षण करून शाळाबा' मुलांची यादी तयार केली जाईल. तसेच या मुलांना त्या-त्या क्षेत्रांतील शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, असेही सोनवणे यांनी सांगितले.