राज्यातील ६० निवासी शाळांची 'शंभर' नंबरी कामगिरी
By संदीप भालेराव | Published: June 7, 2023 06:17 PM2023-06-07T18:17:52+5:302023-06-07T18:19:01+5:30
राज्यातील ९० शाळांपैकी ६० निवासी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे असून त्यामध्ये नाशिक विभागातील पाच शाळांचा समावेश आहे.
नाशिक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुला व मुलींच्या शासकीय निवासी शाळेमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे दहावी परिक्षेत खणखणीत नाणे वाजले आहे. राज्यातील ९० शाळांपैकी ६० निवासी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे असून त्यामध्ये नाशिक विभागातील पाच शाळांचा समावेश आहे. समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती मुले व मुलींच्या शासकीय निवासी शाळेमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत केलेल्या कामगिरीने समाजकल्याण विभागाचीही कामगिरी उंचावली आहे. राज्यात कार्यरत असलेल्या ९० शाळांपैकी ६० निवासी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नाशिक विभागातील ५ शाळांचा समावेश आहे.
दहावीच्या निकालात २१ शाळांचा निकाल देखील ९० टक्के पेक्षा अधिक लागला आहे. ७ निवासी शाळांचा ८० पेक्षा अधिक लागला. समाज कल्याण विभागाच्या राज्यातील ९० निवासी शाळेतुन मार्च २०२३ मध्ये २३८६ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी २३१९ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यातुन शासकिय निवासी शाळा महागांव ता महागांव जिल्हा यवतमाळ येथील विद्यार्थीनी दिक्षा विनोद नरवाडे ही ९४.६० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम आली आहे.
नाशिक विभागातील साक्री जिल्हा धुळे, हवेली जिल्हा नंदुरबार, शाहादा जिल्हा नंदुरबार व अहमदनगर जिल्हातील कर्जत व जामखेड येथील एकुण पाच निवासी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. या शाळांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवी ते दहावी विनामूल्य शिक्षणाची व निवासाची सोय करण्यात येते. समाज कल्याण विभागाची ही महत्त्वाची योजना असून यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे.