पेठ तालुक्यात आजपासून शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:16 AM2021-03-01T04:16:56+5:302021-03-01T04:16:56+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने ग्रामीण भागात पालकांसह विद्यार्थी विविध कारणाने स्थलांतरित झाले. यामुळे कोरोनानंतर शिक्षण ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने ग्रामीण भागात पालकांसह विद्यार्थी विविध कारणाने स्थलांतरित झाले. यामुळे कोरोनानंतर शिक्षण सुरू करत असताना शिक्षणापासून दुरावलेल्या सर्व बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करून घेण्यासंदर्भात शोधमोहीम १ ते १० मार्चदरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये कुटुंब सर्वेक्षण, स्थलांतरित विद्यार्थी, सतत गैरहजर विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध घेऊन संबंधित बालकांना वयानुसार शाळेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
तालुका ते शाळास्तर संनियंत्रण शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार संदीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय संनियंत्रण समिती गठित करण्यात आली असून, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप सदस्य सचिव आहेत. केंद्रस्तर व शाळा स्तरावर संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या शोधमोहिमेत तालुक्यातील महसूल, आरोग्य, एकात्मिक बालविकास, ग्रामपंचायत आदी शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
विद्यार्थिनिहाय डाटा संकलन
१ ते १० मार्चदरम्यान राबविण्यात येणाऱ्या शोधमोहिमेत आढळून आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे तालुकास्तरावर एकत्रित संकलन करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सोयीच्या व जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी तालुकास्तरावरून नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
पेठ तालुका शाळा आकडेवारी
जि.प. शाळा- १८९
माध्यमिक शाळा- १७
खासगी प्राथमिक- ०१
शास. आश्रम- ११
खाजगी आश्रम- ०८
एकूण- २२६
महाविद्यालय- ०२
इंग्रजी माध्यम- १
कोट...
पेठ हा अतिदुर्गम तालुका असला तरी कोरोनाकाळात शिक्षकांनी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने मुलांच्या घरापर्यंत पोहोचून शिक्षण प्रकिया सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या शाळाबाह्य शोधमोहिमेत आढळून येणाऱ्या सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत नियोजन करण्यात आहे.
-सरोज जगताप, गटशिक्षणाधिकारी, पेठ