द्राक्षातून निघाले अन् बेदाण्यात अडकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:10+5:302021-06-03T04:12:10+5:30
नाशिक : कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट काही संपता संपेना. मागणी नसल्याने या वर्षी द्राक्षाला दर मिळाला ...
नाशिक : कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट काही संपता संपेना. मागणी नसल्याने या वर्षी द्राक्षाला दर मिळाला नाही. केंद्र शासनाच्या धोरणामुळे निर्यातीवरही मोठ परिणाम झाला. अगदी अल्प दरात द्राक्ष विकण्यापेक्षा अनेकांना बेदाणा तयार करण्याचा निर्णय घेतला, पण सध्या बेदाण्याला मिळणारा भाव पाहता, द्राक्षातून निघाले आणि बेदाण्यात अडकले, अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र मोठे आहे. नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाचे संकट यामुळे सन २०१९ पासून द्राक्ष उत्पादकांवर एकापाठोपाठ संकटे येत आहेत. मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटामुळे परदेशातून द्राक्षाला असलेली मागणी घटली, जी काही निर्यात झाली त्याला फारसा दर मिळाला नाही. त्यात केंद्र शासनाने निर्यातीसाठी देण्यात येणारे अनुदानही बंद केल्याने निर्यातदार निर्यतीसाठी फारसे उत्सुक दिसले नाहीत. या वर्षी निर्यातक्षम द्राक्ष स्थानिक बाजारात आले. मात्र, मागणी कमी असल्याने द्राक्षाला अवघा ३० ते ४० रुपये किलोंचा दर मिळाला. इतक्या अल्प दरात द्राक्ष विकण्यापेक्षा अनेकांनी बेदाणा तयार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, द्राक्षातून निघालेले अनेक शेतकरी आता बेदाण्यात अडकले आहेत. कारण बेदाण्याला सध्या अवघा ७५ ते १२० रुपये किलोचा दर मिळत आहे. जो बेदाणा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना १६५ ते १७० रुपये खर्च येत आहे, तो ४० ते ५० रुपये नुकसान सहन करून विकावा लागत आहे. यामुळे जिल्ह्यातील बेदाणा इंडस्ट्री पूर्णपणे धोक्यात आली आहे.
चौकट-
लॉकडाऊनचा फटका
जगभरात आलेल्या कोरोना संकटामुळे देशासह परदेशातही अनेक ठिकाणी लॉकडाउन असल्यामुळे सध्या बेदाण्याला मागणी घटली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये मागणी असते, पण या वर्षी तीही नाही. परदेशातून मागणी आली, तर बेदाणा २०० रुपये किलोपर्यंत जाऊ शकतो. स्थानिक बाजार पेठेतही लॉकडाऊनमुळे मागणी कमी असल्याने, पिंपळगाव बाजार समितीत बेदाण्याला खूपच कमी दर मिळत आहे.
कोट-
सन २०१९ पासून द्राक्ष उत्पादकांवर संकट येत आहेत. १९-२० मध्ये अनेकांचे पैसे बुडाले. या वर्षी बेदाणा लॉकडाऊनमध्ये अडकला मागणी नसल्याने भात खूपच कमी मिळत आहे. या वर्षी तसे बेदाण्याचे फारसे उत्पादन नाही, तरीही त्याला मिळणारा दर खूपच कमी आहे. यामुळे बेदाणा इंडस्ट्री संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
- अंबादास दिघे, बेदाणा उत्पादक, दात्याणे, ता.निफाड