वाढणार शितलहरींचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:55+5:302021-01-18T04:13:55+5:30

मागील दहा वर्षांमध्ये जानेवारीत नाशकात मोठ्या प्रमाणात किमान तापमानाचा पारा घसरलेला दिसून येतो. यावर्षी लहरी निसर्गामुळे जानेवारीचा पंधरवडा उलटूनही ...

Outbreaks appear to be exacerbated during this time | वाढणार शितलहरींचा प्रकोप

वाढणार शितलहरींचा प्रकोप

Next

मागील दहा वर्षांमध्ये जानेवारीत नाशकात मोठ्या प्रमाणात किमान तापमानाचा पारा घसरलेला दिसून येतो. यावर्षी लहरी निसर्गामुळे जानेवारीचा पंधरवडा उलटूनही थंडीची तीव्रता वाढलेली नाही. मात्र, हळूहळू आकाश दिवसा व रात्रीसुध्दा निरभ्र राहण्यास सुरुवात झाल्याने किमान तापमानही आता घसरू लागले आहे. प्रजासत्ताक दिनानंतर पुढील काही दिवस शहरात थंडीचा कडाका अनुभवयास येऊ शकतो, असे पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रप्रमुख सुनील काळभोर यांनी सांगितले.

उत्तरेकडून येणारे वारे हे थंड असून, या वाऱ्यांचा वेग हा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे दिल्लीमार्गे वारे मध्यप्रदेश व महाराष्ट्रात दाखल होतात. उत्तरेचे थंड वारे आणि रात्री दक्षिण - पूर्वेकडील वाहणारे वारे यामुळे थंडीची तीव्रता येत्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्रात वाढण्याचा अंदाज काळभोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविला आहे.

गेल्या वर्षी नाशिकमध्ये १७ जानेवारी रोजी ४ अंशांपर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला होता. यावर्षी मात्र रविवारी (दि. १७) १६.४ इतके किमान तापमान नोंदविले गेले. यामध्ये मोठी तफावत असली तरीदेखील पुढील काही दिवसानंतर महिन्याच्या सरत्या दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. मध्य-उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवारी राज्यात सर्वात कमी ११.५ इतके किमान तापमान गोंदियामध्ये नोंदविले गेले.

----इन्फो--

वाढलेले कमाल तापमानही घसरतेय

मागील काही दिवसांपासून शहराचे कमाल तापमानही वाढल्याने नाशिककरांना उष्माही जाणवत आहे. मात्र, आता कमाल तापमानाचा पाराही अंशत: घसरण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी कमाल तापमान ३२.१ अंश, तर किमान तापमान १४.५ अंश नोंदविले गेले होते. रविवारी कमाल तापमान ३१.९ अंशांवर आले. त्याचप्रमाणे शनिवारच्या तुलनेत रविवारी किमान तापमान वाढलेले राहिले.

---इन्फो--

रात्री ढगाळ हवामान

सध्या काही दिवसांपासून शहरात दिवसा आकाश निरभ्र दिसत असले तरीदेखील संध्याकाळनंतर रात्रभर ढग दाटून येत असल्याने किमान तापमानाचा पारा घसरण्याऐवजी वाढताना दिसतो. मात्र, पुढील काही दिवसांत हवामानात बदल होऊन रात्रीसुध्दा आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. यामुळे चालू महिन्याचा अखेरचा आठवडा थंडीच्या कडाक्यामुळे चर्चेत राहू शकतो.

---

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.