निकालाची उत्कंठा शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:21 AM2019-10-24T01:21:55+5:302019-10-24T01:22:35+5:30
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी करीत असलेल्या १४८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून, सकाळी ८ वाजेपासून सर्वच मतदारसंघांमध्ये मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.
नाशिक : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी करीत असलेल्या १४८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून, सकाळी ८ वाजेपासून सर्वच मतदारसंघांमध्ये मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी १२ वाजेनंतर निकाल हाती येण्यास सुरुवात होणार असले तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवर पोलिसांनी निर्बंध लादले आहेत.
अत्यंत चुरशीच्या व काही मतदारसंघांत अती-तटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्णातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. एकूण ४५ लाख ४४ हजार ६४१ मतदारांपैकी २८ लाख १७ हजार ९९७ मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्णात सरासरी ६२.१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच राजकीय पक्षांनीही निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केले होते. तरीदेखील २०१४च्या तुलनेत दोन टक्क्याने मतदान घटले. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे २००९ प्रमाणेच यंदा कॉँग्रेस आघाडी व महायुती अशी सरळसरळ लढत झाली. काही मतदारसंघांमध्ये महाराष्टÑ नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडीबरोबरच काही अपक्षांनीही निवडणुकीत रंगत आणली होती. त्यामुळे कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी व बहुरंगी लढती झाल्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस पहावयास मिळाली. त्याचबरोबर निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले होते. सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रात्रीचा दिवस करून प्रचारात स्वत:ला झोकून देत मतदानानंतर आपणच विजयी होऊ, असा दावा केला असला तरी त्याचा फैसला गुरुवारी होणार आहे.
दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच उमेदवारांचे कल जाहीर होणार
गुरुवारी सकाळी ८ वाजता प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीस सुरुवात करण्यात येणार असून, प्रारंभी निवडणुकीच्या कामात नेमलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केलेल्या टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाईल.
निवडणूक निरीक्षक व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष स्ट्रॉँगरूमचे सील काढण्यात येऊन मतपेट्या मोजणीसाठी प्रत्येक टेबलावर देण्यात येईल. साधारणत: पहिली फेरी जाहीर करण्यासाठी ४० मिनिटे लागतील, त्यानंतर मात्र प्रत्येक फेरीसाठी २० मिनिटे लागतील. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वच उमेदवारांचा कल जाहीर होणार असून, आघाडी, पिछाडी पाहून उमेदवार दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यास मोकळे होतील.