महिनाभरात निकाल : युवतीच्या विनयभंगप्रकरणी एक वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 08:06 PM2021-02-20T20:06:58+5:302021-02-20T20:07:44+5:30
महिनाभरापुर्वीच या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने पिडिता, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि सबळ पुराव्यांअधारे राजू यास या गुन्ह्यात दोषी धरले.
नाशिक : कोरोना काळात अंबड परिसरातील एका चाळीमधील घरात बळजबरीने शिरुन एका २३ वर्षीय युवतीचा हात पकडून स्वत:च्या अंगावर ओढून घेत स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला महिनाभरापुर्वी सुरु झाला. शनिवारी (दि.२०) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी.के.गावंडे यांनी आरोपी राजु दिलीप खताळे (रा.पाथर्डीफाटा) यास दोषी धरत एक वर्षाचा सश्रम कारावास व ४ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील एका चाळीत राहणाऱ्या पिडितेच्या घरात २५ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी राजू याने बळजबरीने प्रवेश केला होता. यावेळी घरात कोण अज्ञात व्यक्ती शिरला हे बघण्यसाठी आलेल्या पिडितेचा हात ओढून राजूने पलंगावर ओढले. अश्लील भाषेत संवाद साधत त्याने स्त्री मनाला लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केले. यावेळी पिडितेने त्याच्या तावडीतून निसटत घराबाहेर पडून दरवाजाला बाहेरुन कडी लावून घेत पोलीस ठाणे गाठले. आरोपी राजू यास तिने घरात कोंडून ठेवले होते. अंबड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ पिडितेचे घर गाठून राजूला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याविरुध्द पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तत्कालीन सहायक निरिक्षक जी.व्ही. शिंदे यांनी गुन्हा सिध्दतेसाठी कसोशिने तपास करत राजुविरुध्द सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. महिनाभरापुर्वीच या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने पिडिता, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि सबळ पुराव्यांअधारे राजू यास या गुन्ह्यात दोषी धरले.