टेंभूरवाडीत जलसंधारण कामाचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:39 PM2019-12-14T23:39:51+5:302019-12-15T00:59:50+5:30
सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील आशापूर (टेंभूरवाडी) येथे युवामित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियानांतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील आशापूर (टेंभूरवाडी) येथे युवामित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियानांतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला.
युवामित्र संस्थेचे सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सिन्नर तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जय हनुमान पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव व संचालक यांच्या माध्यमातून गावातील जलसंधारणाच्या कामाचा विकास आराखडा तयार करण्यात आला. पाणी व्यवस्थापन, जबाबदारी, जास्तीत जास्त सभासद बनविणे तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंध करून कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेऊन दरडोई उत्पन्नात कशी भर पाडता येईल व गावातील भूजल पातळीत कशी वाढ करता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेत युवामित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवामित्र संस्थेच्या जलसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, प्रकल्प समन्वयक मंगेश बोपचे यांच्या मार्गदर्शनाने प्रीतम लोणारे यांनी गावात असलेल्या जलस्रोतांमधील गाळ काढण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यामध्ये युवामित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउण्डेशनमार्फत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. महाराष्ट्र शासनामार्फत मशीनसाठी लागणारे इंधन देण्यात येईल तसेच बंधाऱ्यातील निघणाºया गाळाची वाहतूक ही लोकसहभागातून करायची असे यावेळी त्यांनी सांगितले. पाणीवापर संस्था सचिव रंगनाथ पाटोळे यांनी मागील दोन वर्षांपासून धनगरी पाझर तलावामध्ये केलेल्या कामांबाबद्दल युवामित्र संस्थेचे आभार व्यक्त केले. यावेळी युवामित्र संस्थेचे क्षेत्र सोमनाथ वाघ, रामदास पालवे, पांडुरंग पाटोळे, रंगनाथ पाटोळे, विष्णू पाटोळे, अशोक पाटोळे, शिवाजी पाटोळे, भाऊसाहेब पाटोळे, दत्तू पाटोळे, जयवंत पालवे, पुंजा पाटोळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.