संतापजनक : नाशकात मनपा कर्मचाऱ्याकडून कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग; झाकीर हुसेन रुग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:09 PM2020-09-08T22:09:53+5:302020-09-08T22:10:30+5:30
कोरोनाच्या भीषण संकटातून राज्य अन् देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणा-या काही घटना वारंवार समोर येत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे.
नाशिक : राज्यात विविध ठिकाणी कोरोनाबाधित महिला रुग्णांसोबत घडलेल्या लाजिरवाण्या घटनांमुळे महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असताना शहरातील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातदेखील असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयातील मनपाच्या एका सफाई कर्मचा-याने येथे उपचार घेणाºया महिला रुग्णाला स्वच्छतागृहाजवळ स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित कर्मचा-याविरुध्द डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या भीषण संकटातून राज्य अन् देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणा-या काही घटना वारंवार समोर येत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात मंगळवारी (दि.६) दुपारच्या सुमारास कोरोनाबाधित महिला रुग्ण नैसर्गिकविधीकरिता स्वच्छतागृहात गेली असता संशयित संशयित मनपा कर्मचारी कैलास बाबुराव शिंदे (५६,रा.जुने नाशिक) याने स्वच्छतागृहाच्या दरवाजावर बाहेरून लाथ मारून महिला रुग्ण आतमध्ये असतानासुध्दा लघवी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या महिलेने आरडाओरड केल्यानंतर रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यानंतर शिंदे याने घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी मनपाचे डॉक्टर बेडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित शिंदे याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला. दरम्यान, घटनेनंतर संशयित शिंदे हा फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजनकुमार सोनवणे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरिक्षक इंगोले हे करीत आहेत.