नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा
By admin | Published: March 7, 2017 12:45 AM2017-03-07T00:45:51+5:302017-03-07T00:46:00+5:30
वीरगाव : बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील कान्हेरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. विशेष म्हणजे एकाच ट्रॅक्टरद्वारे या वाळूची वाहतूक होत आहे.
वीरगाव : बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील कान्हेरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. विशेष म्हणजे एकाच ट्रॅक्टरद्वारे या वाळूची वाहतूक होत आहे. या प्रकरणी सदर ट्रॅक्टरमालकास त्वरित अटक करावी व होणारा वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी डोंगरेजचे सरपंच व उपसरपंच यांनी निवेदनाद्वारे बागलाणचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
कान्हेरी नदी परिसरात सर्वात मोठे नदीपात्र म्हणून ओळखली जात असली तरी नदीपात्रातून होत असलेला वाळु उपसा यामुळे नदीपात्रात खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळे जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच या प्रकारामुळे परिसरातील विहीरींची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. यासाठी डोंगरेज ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन वाळु उपसा बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला होता. परंतु गावातीलच एका ट्रॅक्टरमालकाने या निर्णयाला केराची टोपली दाखवित आपली मुजोरी कायम ठेवली आहे. त्यास गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी वारंवार समज देण्याचा प्रयत्न केला असता, तुम्हाला काय करायचे ते करा, आमचे कुणीही वाकडे करु शकत नाही. अशा आशयाचा सज्जड दम देत हा ट्रॅक्टरमालक ग्रामस्थांनाच जिवे ठार मारण्याच्या धमक्या देत आहे. डोंगरेज येथील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदार यांची भेट घेत संंबंधित ट्रॅक्टरमालकावर कारवाई करण्यात यावी, यासाठी निवेदन दिले. (वार्ताहर)