सलग दुसऱ्या दिवशी बाधित शंभरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 01:46 AM2021-09-16T01:46:04+5:302021-09-16T01:47:18+5:30
जिल्ह्यात बाधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी शंभरपार असून विशेष म्हणजे दोन्ही दिवस कोरोनामुक्तच्या तुलनेत बाधितांचा आकडा दीडपटीहून अधिक आहे. सलग दोन दिवस बाधित अधिक आढळल्याने एकूण उपचारार्थी बाधितांची संख्या पुन्हा नऊशेपार जाऊन ९२९ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात बाधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी शंभरपार असून विशेष म्हणजे दोन्ही दिवस कोरोनामुक्तच्या तुलनेत बाधितांचा आकडा दीडपटीहून अधिक आहे. सलग दोन दिवस बाधित अधिक आढळल्याने एकूण उपचारार्थी बाधितांची संख्या पुन्हा नऊशेपार जाऊन ९२९ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात बुधवारी (दि.१५) एकूण ६५ कोरोनामुक्त तर १०३ नवीन बाधित आढळून आले आहेत. बाधितांच्या आकडेवारी नाशिक मनपाचे ३३ तर नाशिक ग्रामीणचे जवळपास दुप्पट ६२ इतके तर जिल्हाबाह्य ८ रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यातही दररोज सिन्नर आणि निफाड या दोन तालुक्यांमध्येच सातत्याने सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला या दोन तालुक्यांमधील कोरोना रुग्णवाढ रोखण्यावर भर द्यावा लागणार आहे. जिल्ह्यातील उपचारार्थी ९२९ रुग्णांपैकी तब्बल ६१३ नाशिक ग्रामीणचे, २९३ नाशिक मनपाचे १५ मालेगाव मनपाचे तर ८ जिल्हाबाह्य रुग्णांचा त्यात समावेश आहे. दरम्यान जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेलेल्या एकमेव बळीमुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या ८६०७ वर पोहोचली आहे.
इन्फो
प्रलंबित पुन्हा हजारवर
जिल्ह्यात प्रलंबित अहवालांचा आकडा पुन्हा हजारवर जाऊन १०७० वर पोहोचला आहे. त्यातही ६९५ रुग्ण नाशिक ग्रामीणचे, २२१ मालेगाव मनपाचे, तर १५४ अहवाल नाशिक मनपाचे प्रलंबित आहेत. नवीन रुग्णसंख्या किंवा एकूण नवीन रुग्णांची संख्या तीन महिन्यापूर्वीच्या तुलनेत कमी असतानाही प्रलंबितचा आकडा पुन्हा एक हजारावर जाणे निश्चितच चिंताजनक आहे.