सकारात्मक! वंशाचा दिवा म्हणून मुलींना पसंती; नकोशी आता हळूहळू वाटू लागली हवीहवीशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 04:58 PM2022-01-03T16:58:16+5:302022-01-03T17:02:18+5:30

नाशिक - मुलगा म्हणजे ‘वंशाचा दिवा’ ही समजूत अजूनही बहुतांश कुटुंबांमध्ये कायम असली तरी समाजातील काही घटकांची मानसिकता आता हळूहळू ...

Over past few years, girls have been more likely to be adopted than boys in adoption process | सकारात्मक! वंशाचा दिवा म्हणून मुलींना पसंती; नकोशी आता हळूहळू वाटू लागली हवीहवीशी

सकारात्मक! वंशाचा दिवा म्हणून मुलींना पसंती; नकोशी आता हळूहळू वाटू लागली हवीहवीशी

googlenewsNext

नाशिक - मुलगा म्हणजे ‘वंशाचा दिवा’ ही समजूत अजूनही बहुतांश कुटुंबांमध्ये कायम असली तरी समाजातील काही घटकांची मानसिकता आता हळूहळू बदलू लागली आहे. कारण मागील काही वर्षांपासून दत्तक प्रक्रियेत मुलांच्या तुलनेत मुलींना अधिक पसंती दिली जात असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. २०१४ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत नाशिक आधार आश्रमातील १६९ बालकांना पालक मिळाले आहेत. विशेष म्हणजे यात ७१ मुले आणि ९८ मुलींचा समावेश आहे.

समाजातील अनेक कुटुंबांमध्ये मुलींना दुय्यम स्थान देऊन मुलांना वंशाचा दिवा मानले जाते. लिंगभेदाच्या या मानसिकतेतून अनेकदा स्त्री भ्रूणहत्येची प्रकरणेदेखील घडतात. तसेच मुला-मुलींच्या संगोपनातही दुजाभाव केला जातो. असे असतानाच बहुतांश कुटुंबांमध्ये आता मुलींनादेखील सन्मानाचे स्थान दिले जात आहे. बालक नसलेल्या अनेक कनवाळू दाम्पत्यांकडूनही दत्तक प्रक्रियेत मुलांच्या तुलनेत मुलींनाच अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे ‘नकोशी’ आता हळूहळू हवीहवीशी वाटू लागली असून ही सकारात्मक बाब आहे. पालकांकडून बेवारस सोडून दिलेल्या किंवा इतर विविध कारणांनी नाकारलेल्या बालकांना आधार आश्रमांकडून आश्रय दिला जातो.

नाशिक आधार आश्रमातही दरवर्षी अशी अनेक निराधार बालके दाखल होतात. तेथून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून इच्छुक पालकांना ही बालके दत्तक दिली जातात. या दत्तक प्रक्रियेतही आता मुलांच्या तुलनेत मुलींना अधिक पसंती मिळत असून ही समाधानकारक बाब आहे.

अशी आहे आकडेवारी

वर्ष------ मुले ----मुली

२०१४ --- १८----१४

२०१५ --- ११----१२

२०१६ ---०७----१४

२०१७ ---०३---- ११

२०१८ ---०६----१७

२०१९ ---१४----१४

२०२० ---११----१०

२०२१ ---०१---०६

एकूण -- ७१---९८

मुलगा, मुलगी यात आता भेदभाव न करता दोघेही समान आहेत, याबाबत आधार आश्रमाकडून जनजागृती आणि पालकांचे समुपदेशन केले जात आहे. गत काही वर्षांत मुलांच्या तुलनेत मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले असल्याने मोहीम यशस्वी होताना दिसून येत आहे, ही निश्चितच सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

- राहुल जाधव,

सीईओ, आधार आश्रम, नाशिक

 

Web Title: Over past few years, girls have been more likely to be adopted than boys in adoption process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.