जिल्ह्यात बारा हजारांहून अधिक बालके कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:52 AM2019-07-28T00:52:29+5:302019-07-28T00:52:59+5:30
पावसाळा सुरू होताच कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून, आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून १२ हजार ६९९ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.
नाशिक : पावसाळा सुरू होताच कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून, आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून १२ हजार ६९९ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. त्यात २ हजार ८९३ बालके अतितीव्र कुपोषित म्हणून आढळून आले, तर ९ हजार ८०६ बालके मध्यम कुपोषित आहेत. या बालकांना ग्राम बालविकास केंद्रांमध्ये दाखल करून पोेषण आहार व वैद्यकीय उपचार केला जात आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून सुमारे २५ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, प्रामुख्याने या तालुक्यांमध्येच कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असले तरी, आता मोठ्या प्रमाणात आदिवासींचे अन्यत्र स्थलांतर होऊ लागल्याने अन्य तालुक्यांमध्येही त्याचे प्रमाण दिसू लागले आहे. गेल्या महिन्यातच यासंदर्भात गावोगावी आरोग्य विभागाच्या वतीने बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन कुपोषित बालकांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात तीन लाख ८५ हजार ३५९ बालकांची तपासणी करण्यात येऊन त्यातील अतितीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची वर्गवारी करण्यात आली. त्यात १२ हजार ६९९ बालके कुपोषित आढळली आहेत. या बालकांना पोषण आहार व आरोग्य उपचार करून त्यांना सदृढ करण्यासाठी गावोगावी ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ग्रामविकास केंद्रांमध्ये दिवसभर कुपोषित बालकांना दाखल करून त्यांना दिवसातून सहा वेळा पोेषक आहार व वैद्यकीय उपचार केले जातात. एकात्मिक बालविकास विभागामार्फत ही केंद्रे चालविली जात असली तरी, कुपोषित बालकांसाठी येणारा खर्च पाहता त्याची तजवीज त्या त्या गावातील ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्याची तरतूद आहे. एका बालकामागे महिन्याला २ हजार १५० रुपये खर्च येत असल्याने जिल्ह्यातील २ हजार ५९९ ग्राम विकास केंद्रांमध्ये दाखल असलेल्या १० हजार ७०९ कुपोषित बालकांसाठी २५ लाख ७०० रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित सुमारे दोन हजार बालकांना त्यांच्या घरीच पोषण आहार व वैद्यकीय उपचार केला जात आहे. ग्राम बालविकास केंद्रात दाखल असलेल्या अतितीव्र कुपोषित बालकांचे मध्यम कुपोषित बालकात वर्गवारी होईपर्यंत या बालकांना दररोज सकाळी ८ वाजता दाखल केले जाते व सायंकाळी ५ वाजता पालकांच्या स्वाधीन केले जाते. साधारणत: पावसाळ्याच्या तीन महिन्यांपर्यंत ही ग्राम विकास केंद्रे कार्यरत राहणार आहेत.
नाशकात ८८६ बालके कुपोषित
मुंबई, पुण्याशी स्पर्धा करणाऱ्या नाशिक महानगरपालिका हद्दीतही कुपोषित बालके आढळली आहेत. शहरातील १८ हजार २१२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असता, त्यात १५२ बालके अतितीव्र कुपोषित म्हणून, तर ७३४ बालके मध्यम कुपोषित आहेत. या बालकांसाठी १६४ ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यात ७५५ बालके दाखल करण्यात आली आहेत.