तब्बल अडीच हजार पार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 01:39 AM2021-03-20T01:39:45+5:302021-03-20T01:40:43+5:30
जिल्ह्यात कोरोनाने सलग तिसऱ्या दिवशी नवीन उच्चांक स्थापित केला. शुक्रवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल २५०८ रुग्ण बाधित रुग्ण आढळले असून कोरोनाने प्रथमच अडीच हजाराचा टप्पा ओलांडल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे वाटचाल करु लागल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग तिसऱ्या दिवशी नवीन उच्चांक स्थापित केला. शुक्रवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल २५०८ रुग्ण बाधित रुग्ण आढळले असून कोरोनाने प्रथमच अडीच हजाराचा टप्पा ओलांडल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे वाटचाल करु लागल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल २५०८ बाधित रुग्ण तर ११६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १,ग्रामीणला ३ तर जिल्हा बाह्य १ असा एकूण ५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२०२ वर पोहोचली आहे.
गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने हजार ते पंधराशेवर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. त्यात बुधवारी कोरोनाबाधितांच्या आकड्याने २१४६ इतका उच्चांक तर गुरुवारी २४२१ पर्यंत बाधितांच्या आकड्याने मजल मारली होती.
तर शुक्रवारी त्यापेक्षाही अधिक म्हणजे २५०८ बाधित आढळून आल्याने या वेगाने जिल्ह्याची वाटचाल कुठे सुरु आहे, त्याबाबत जनमानसात चर्चेला उधाण आले आहे. तसेच निर्बंध वाढण्याची चर्चा आहे.
दहा दिवसांत बाधित वाढ १५ हजारांनजीक
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत हजारावर भर पडण्यास ११ तारखेपासून प्रारंभ झाला. ११ मार्चला ११४०, १२ मार्चला ११३८ , १३ मार्चला १५२२, १४ मार्चला १३५६, १५ मार्चला १३७६, १६ मार्चला १३५४ असा सलग आठवडाभर कोरोनाबाधितांच्या संख्येने अक्षरश दररोज हजाराचा आकडा ओलांडला. त्यानंतर कोरोनाबाधितांचा गतवर्षापासूनचा नवीन उच्चांक तब्बल २१४६ बाधित १७ मार्चला, त्यानंतर पुन्हा १८ मार्चला नवीन उच्चांक २४२१ तर १९ मार्चला सर्वोच्च उच्चांक २५०८ वर पोहोचल्याने गत दहा दिवसात ही बाधित संख्या तब्बल १४ हजार ९९१ म्हणजे १५ हजारांनजीक पोहोचली आहे.
जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रलंबित अहवाल पाच हजारांवर
जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात आठवडाभरात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, नमुना तपासणीच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून शुक्रवारी ही प्रलंबित अहवाल संख्या ४९५७ वर पोहोचली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी कोरोना बाधितांचा आकडा मोठाच राहण्याची चिन्हे आहेत.