कोरोनावर मात; तरी विविध कारणांनी रुग्णालयात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:37+5:302021-07-17T04:12:37+5:30
नाशिक : कोरोनाचा स्कोअर अधिक असतानाही त्यावर मात करण्याचे दिव्य पार पाडल्यानंतरही काही अन्य आजारांसाठी जिल्ह्यात ३७ रुग्णांवर उपचार ...
नाशिक : कोरोनाचा स्कोअर अधिक असतानाही त्यावर मात करण्याचे दिव्य पार पाडल्यानंतरही काही अन्य आजारांसाठी जिल्ह्यात ३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्युकरमायकोसिस व्यतिरिक्त अन्य काही व्याधी देखील कोरोनामुक्त नागरिकांना रुग्णालयातच राहण्यासाठी बाध्य ठरत आहेत.
कोरोना बरा झाल्यानंतरही ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना म्युकरमायकोसिसच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून रुग्णालयातच ठेवणे आवश्यक ठरते. मात्र, त्याव्यतिरिक्त देखील अनेक आजार आणि व्याधींसाठी देखील नागरिकांना रुग्णालयातच रहावे लागत आहे. काही नागरिकांना डेंग्यूसदृश आजार, काहींना डायरिया, डोकेदुखी , पोटदुखी यासारखे देखील आजार होत आहेत. ही लक्षणं सहसा दुर्लक्षित केली जातात आणि बदलत्या हवामानामुळे झालेला आजार किंवा अन्न विषबाधा म्हणून त्याकडे पाहिले जाते. परंतु, कोरोना व्हायरस आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हवामानानुसार त्याची जीनोमिक रचना बदलत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणे आहे. सामान्यत: खोकला, ताप, श्वासोच्छवास घेण्यास त्रास यासारखी लक्षणं दिसून आल्यानंतरच एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्गाची चाचणी करुन त्यावर उपचार केले जातात. परंतु आता असेही रुग्ण आढळत येत आहेत, ज्यांना सुरुवातीला डायरिया, डोकेदुखी आणि उलटी होण्याची समस्या होती आणि त्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. तर काहींचा कोरोना बरा झाल्यानंतरही त्यांच्यात खोकला आणि अन्य काही लक्षणे कायम रहात असल्याने त्यांना खबरदारी म्हणून रुग्णालयातच ठेवून उपचार केले जात आहेत.
इन्फो
कोरोना बरा, पण श्वसनाचा त्रास
काही रुग्णांना आधीपासूनच श्वसनाचा त्रास होता. त्यांना कोरोना झाल्यानंतर तो उपचाराअंती बरा झाला. मात्र, श्वसनाचा विकार कायम असल्याने अनेकांना अद्यापही रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.
काहींची ऑक्सिजन लेव्हल नेहमीच कमी असते. काहींना अस्थम्याचा त्रास असतो. त्यांना देखील श्वसनाची समस्या वाटत असल्याने अशाही काही रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर रुग्णालयात
सातत्याने जावे लागत आहे.
इन्फो
पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना
पोस्ट कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक वयोगटातील आहेत. त्यातील बहुतांश रुग्णांना उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, पोटाचे विकार यासह अनेकोनेक व्याधींनी ग्रासलेले आहे. त्यामुळे पोस्ट कोविडच्या उपचारात या रुग्णांचा भरणा असून त्याखालोखाल मध्यम वयोगटातील कोमार्बिड रुग्णांचा समावेश आहे.
इन्फो
बरे झाल्यानंतरही काळजी आवश्यक
ज्या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच किडनीच्या व्याधी आहेत, त्या रुग्णांनी बरे झाल्यानंतरही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
ज्या रुग्णांना श्वसनाचे, श्वसननलिकेशी संबंधित कोणतेही आजार आहेत, त्या रुग्णांनी देखील कोरोना पश्चातही दक्षता घेण्याची गरज आहे.
--------------------
ही डमी आहे.