भक्तीची कोरोनावर मात : देशात प्रथमच ऑनलाईन विधानाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 06:37 PM2020-06-28T18:37:06+5:302020-06-28T18:42:12+5:30
दिगंबर जैन परंपरेनुसार दरवर्षी अष्टान्हिका पर्वात म्हणजे चातुर्मास सुरु होण्याच्या ८ दिवस अगोदरचा काळात संपूर्ण देशभरातील जैन मंदिरात सिध्दचक्र विधानाचे आयोजन केले जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये यावर्षी असे विधान शक्य नसल्याने यावर्षी ऑनलाईन सिद्धचक्र विधान आयोजन करण्यात आले असुन नाशिकचे युवा पारस लोहाडे यांच्या या योजनेला णमोकार तीर्थ प्रणेता प.पू. आचार्य श्री देवनन्दिजी गुरुदेव यांनी मान्यता दिल्यानंतर त्यांच्या संकल्पनेनुसार सोशल मिडीयाच्या माध्यमातुन केवळ तीन दिवसांत देशभरातील ७५० भक्तांनी यात सहभागी होण्यासाठी संमती दिली.
नाशिक : दिगंबर जैन परंपरेनुसार दरवर्षी अष्टान्हिका पर्वात म्हणजे चातुर्मास सुरु होण्याच्या ८ दिवस अगोदरचा काळात संपूर्ण देशभरातील जैन मंदिरात सिध्दचक्र विधानाचे आयोजन केले जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये यावर्षी असे विधान शक्य नसल्याने यावर्षी ऑनलाईन सिद्धचक्र विधान आयोजन करण्यात आले आहे.
ऑनलाईन पद्धतीने या सिद्धचक्र विधानामध्ये भक्तांना झूम अॅपद्वारे घरबसल्या सहभागी होता येणार असून संगीतकारही घरी बसुन संगीत देतील. पंडीतही याचपद्धतीने मंत्रपठण करतील असे नियोजन करण्यात आले असून देवनन्दिजी महाराज णमोकार तीर्थावरुन मार्गदर्शन देणार आहेत. या विधानात दोन हजार अर्घ्य दिले जातात. त्यासाठी आवश्यक पुस्तकांऐवजी मोबाईळ स्क्रिनवर वेळोवेळी अर्घ्य दाखविले जाणार आहेत. नाशिकचे युवा पारस लोहाडे यांच्या या योजनेला णमोकार तीर्थ प्रणेता प.पू. आचार्य श्री देवनन्दिजी गुरुदेव यांनी मान्यता दिल्यानंतर त्यांच्या संकल्पनेनुसार सोशल मिडीयाच्या माध्यमातुन केवळ तीन दिवसांत देशभरातील ७५० भक्तांनी यात सहभागी होण्यासाठी संमती दिली. हे विधान २८ जुन पासून ५ जुलैपर्यंत चालणार असून यात रोज सकाळी ६ ते ८ श्रीजींचे अभिषेक, रूजन, विधान आदि संपन्न होतील. संध्याकाळी ७ वाजता विधानाची आरती, आचार्य श्रींचे प्रवचन, आरती, चर्चा समाधान आदि संपन्न होणार आहेत. यात देश विदेशातील भाविक सहभागी झाले असून यात अमेरिका, संयुक्त अमिरात, दुबई येथील जैन धर्मीय यामध्ये शामिल झालेले आहेत.या विधानाचे आयोजन जैनम डिजीटल झूम चैनल वर करण्यात आले असून सूत्रसंचालन औरंगाबाद येथील प्रविण लोहाडे करीत आहे. भोपाळ येथील धरमवीर जैन हे संगीतकार असून या विधानात सहभागी होण्यासाठी रोज सकाळी जैनम झूम चैनल सुरू करून असण्याचे आवाहन णमोकार तीथार्चे अध्यक्ष निलम अजमेरा, उपाध्यक्ष महावीर गंगवाल, मंत्री अनिल जमगे, संतोष काला व खजिनदार वैशाली दीदी यांनी केले आहे.
कोरोनाच्या काळात तीन महिन्यापासून भक्त घरी बसुन कंटाळले आहेत. मंदिरात जायची सोय नाही. देवदर्शन नाही, त्यामध्ये अष्टान्हिका पर्व हे सगळ्यात मोठे पर्व असुनही मंदिरात जाताही येणार नाही यासाठी भक्त नाराज होते, या संकल्पनेचा भक्तांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असून कोरोना संक्रमणाची भितीही संपली आहे. -आचार्यश्री देवनन्दिजी गुरुदेव, विधानाचे मार्गदर्शक