कार्यमग्नतेतूनच अडचणींवर मात केली.

By admin | Published: January 5, 2015 01:47 AM2015-01-05T01:47:42+5:302015-01-05T01:48:27+5:30

कार्यमग्नतेतूनच अडचणींवर मात केली.

Overcoming difficulties in the workforce. | कार्यमग्नतेतूनच अडचणींवर मात केली.

कार्यमग्नतेतूनच अडचणींवर मात केली.

Next

नाशिक : ‘काहीही न बोलता काम करीत राहिलो. कशाचीच अपेक्षा केली नाही. कार्यमग्नतेतूनच अडचणींवर मात केली. त्यातूनच भक्कमपण आले... साधे-सोपे राहिलो, तरी आपल्या आयुष्यावर चित्रपट निघाला, समाजाकडून भरभरून प्रेम मिळते आहे... आणखी काय हवे?’- अशी कृतार्थ भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाताई आमटे यांनी व्यक्त केली.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) व समकालीन प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आमटे दाम्पत्याशी मुक्त संवादाचा कार्यक्रम कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात झाला, त्यावेळी या दोन्ही सेवाव्रतींनी अनेक विषयांवर मनमोकळी मते मांडली. डॉ. शशांक कुलकर्णी व डॉ. नीरजा कणीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. बाबा आमटे यांचे संस्कार, हेमलकसा प्रकल्प, तेथील सोयी-सुविधा, मुलांचे विवाह, आदिवासींची जीवनपद्धती, समाजाचा दृष्टिकोन अशा अनेक विषयांना मुलाखतीतून स्पर्श करण्यात आला.
डॉ. प्रकाश आमटे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात आदिवासींचे दु:ख जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हीच कामाची ऊर्जा होती. आदिवासींचा आमच्यावर विश्वास बसत नव्हता; पण त्या काळाला ‘खडतर’ म्हणणे चुकीचे ठरेल. कारण ते सारे आम्ही स्वत:हून स्वीकारले होते. दोघांनी मिळून निर्णय घेतले. सुख-दु:खे ‘शेअर’ करू शकत नव्हतो. त्यामुळे संयम शिकलो. आता आमची तिसरी पिढी आदिवासींसाठी झोकून देऊन काम करीत आहे. हेमलकसा प्रकल्पाच्या शाळेतील मुले डॉक्टर, इंजिनिअर होऊ लागली आहेत. तेथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यात आम्ही निमित्तमात्र असून, समाजाच्या पाठिंब्यामुळेच हे होऊ शकले.
डॉ. मंदाताई यांनी सांगितले की, प्रारंभी लोकांचा आमच्यावर विश्वास बसत नसल्याने नैराश्य यायचे. कोणी बोलायलाच नसल्याने आमचे एकमेकांशी चांगले ‘ट्यूनिंग’ जमले. आदिवासींची भाषा शिकलो. कामात वेळ घालवल्याने जीवन कंटाळवाणे झाले नाही. आदिवासींचे स्त्रीजीवन, तेथील विवाहाच्या प्रथा-परंपरा यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
सुमारे दीड तास हा कार्यक्रम सुरू होता. समकालीन प्रकाशनाचे आनंद अवधानी यांनी प्रास्ताविक केले. आमटे यांच्यातील डॉक्टर समजावून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे ते म्हणाले.
डॉ. मंगेश थेटे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार तथा ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. राहुल अहेर यांच्या हस्ते आमटे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुहास कुलकर्णी, मुक्ता चैतन्य, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, डॉ. आवेश पलोड आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: Overcoming difficulties in the workforce.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.