दसाणे पाठोपाठ पठावा धरणही ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 05:00 PM2018-08-02T17:00:24+5:302018-08-02T17:00:35+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील दसाणे लघुसिंचन प्रकल्प मागील आठवड्यात ओव्हरफ्लो झालेला असतांनाच बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील पठावा लघुसिंचन प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाल्याने हत्ती नदी खळखळून वाहू लागली आहे.
पावसाळा सुरु होवून दोन महिने उलटले तरी बागलाण तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. बुधवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजेपर्यंत बागलाण तालुक्यातील सर्वाधिक ११६६ दलघफू साठवण क्षमता असलेल्या हरणबारी धरणात (९० टक्के) १०५४ दलघफू तर ५७२ दलघफू क्षमता असलेल्या केळझर धरणात ३९१ दलघफु (७० टक्के) इतका जलसाठा आहे. जाखोड या लघुसिंचन प्रकल्पात बुधवारपर्यंत केवळ ५० टक्के जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
आठवडाभरापासून पावसाने संपूर्णपणे उघडीप दिली असून केवळ ढगाळ वातावरण असल्याने पिके तग धरून आहेत. बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतातूर झालेला असून बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगररांगांमध्ये बऱ्यापैकी पर्जन्यमान झाल्याने दसाणे पाठोपाठ पठावा धरण भरून ओव्हरफ्लो झाल्याने दोन्ही धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.