रातराणी बस प्रतीक्षेत : प्रवासी ट्रॅव्हल्सकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:48+5:302021-07-14T04:17:48+5:30
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू झालेल्या असल्या तरी प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. महामंडळाच्या रातराणी ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू झालेल्या असल्या तरी प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. महामंडळाच्या रातराणी बसेसपेक्षा खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेसला प्रवासी मिळत असल्याचे दिसून येत आहे. महामंडळाच्या रातराणी आणि स्लीपर बसला काही प्रमाणात प्रवासी दिसून येतात. मात्र, खासगी बसेसच्या तुलनेत ही संख्या कमीच आहे.
महामंडळाला प्रवासी वाहतूक सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना निर्बंधामुळे पूर्ण क्षमतेने बसेस अजूनही सुरू झालेल्या नाहीत. आंतरराज्य तसेच जिल्ह्याबाहेरील बसेस अजूनही बंदच आहेत. रात्रीच्या सुमारास धावणाऱ्या बसेसला देखील मर्यादा असल्याने प्रवाशांना खासगी बसचा पर्याय उपलब्ध होत आहे. महामंडळाच्या तीन स्लीपर बसेस धावत आहेत. मात्र, त्यांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. तूर्तास एकच शयनयान सुविधेची बस सुरू आहे.
--इन्फो--
एसटीच्या सुरू असलेल्या रातराणी
१) काेल्हापूर
२) सेालापूर
३) अमरावती
४) हिंगोली
५) नागपूर
६) लातूर
--इन्फो--
एसटीकडे सहा स्लीपरकोच बसेस
१) रात्रीच्या सुमारास प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवास करता यावा यासाठी महामंडळाने शयनयान बसेस सुरू केलेल्या आहेत. नाशिकमधून नागपूर, अहमदाबाद आणि कोल्हापूर या शयनयान बसेस चालविल्या जातात. मात्र, कोरोना निर्बंधामुळे केवळ नागपूरची बस सुरू आहे. इतर दोन्ही बसेस बंद आहेत.
२) सध्या इतर राज्यांनी महाराष्ट्रातील बससेवेला परवानगी दिलेली नसल्याने रातराणी असलेल्या अनेक बसेस बंदच आहेत. त्यामुळे खासगी बसेसचा पर्याय प्रवासी निवडत असल्याचे दिसते.
--इन्फो--
एसटीपेक्षा तिकीट जास्त
राज्य परिवहन महामंडळापेक्षा खासगी बसेसचे तिकीट दर दुपटीने अधिक आहेत. असे असतानाही खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवासी प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. नाशिकमधून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या अनेक बसेस आहेत. परंतु जिल्ह्यातील बसेसला पुरेसा प्रतिसाद नसताना रातराणी बसेसला किती प्रवासी असणार हा खरा प्रश्न आहे. सध्या रातराणीची संख्यादेखील कमी झाल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
--कोट--
खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेसमधून प्रवास करण्याचा आनंद नक्कीच असतो. सुस्थितीतील बसेस आणि अंतर्गत रचना प्रवाशांना आकर्षित करणारी असते. कोरोनाच्या काळात खासगी बसेस अधिक सुरक्षित वाटतात. महामंडळाच्या बसेसला होणारी गर्दी आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे खासगी बसमधून प्रवास करणे कधीही सोयीचे ठरते.
- जयवंत भुसे, प्रवासी
राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सुरक्षित आणि विश्वासाची असल्याने बसमधून प्रवास करण्याला नेहमीच प्राधान्य असते. परंतु, महामंडळाच्या बसेस सर्वच ठिकाणी जात नसल्याने आणि नेमक्या कोणत्या बसेस सुरू आहेत आणि कोणत्या बंद हे बुकींगलाच कळते. अशावेळी खासगी बसचा आधार घ्यावा लागतो. आम्हांला दोनदा असा अनुभव आला आहे. शेवटी प्रवास करणे अत्यावश्यक असल्याने खासगी बसचा आधार घ्यावाच लागतो.
- रोहित पालवे, प्रवासी
130721\13nsk_24_13072021_13.jpg
रातराणी बस प्रतिक्षेत: प्रवासी ट्रॅव्हल्सकडे