ऑक्सिजनची समस्या अधिकच बिकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:52+5:302021-04-16T04:13:52+5:30

नाशिक : कोरोनाच्या भयावह वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऑक्सिजन साठ्याची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे. खासगी रुग्णालयांबरोबरच आता ...

Oxygen problem worsens! | ऑक्सिजनची समस्या अधिकच बिकट !

ऑक्सिजनची समस्या अधिकच बिकट !

googlenewsNext

नाशिक : कोरोनाच्या भयावह वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऑक्सिजन साठ्याची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे. खासगी रुग्णालयांबरोबरच आता शासकीय रुग्णालयांनादेखील ऑक्सिजनची टंचाई जाणवू लागल्याने येत्या आठवडाभरात हीच स्थिती राहिल्यास समस्या अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यात वारंवार समस्या निर्माण होऊ लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. श्रीवास यांची ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, शासकीय रुग्णालये, मनपा रुग्णालये, मालेगाव मनपा रुग्णालये आणि खासगी रुग्णालये असा सर्व यंत्रणांशी समन्वय राखणे फारच अवघड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आता नियोजनासाठी तीन स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर ऑक्सिजनची उपलब्धता असलेले बेड कमी पडत होते. तसेच ऑक्सिजनचा पुरवठादेखील कमी होऊ लागल्याने अचानक रुग्ण वाढले तर काय, त्यामुळेच ऑक्सिजन प्लांट उभारणीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यात मनपाच्या वतीने नाशिकरोड येथील नूतन बिटको रुग्णालय आणि द्वारकानजीकचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे अनुक्रमे १९ हजार लिटर आणि १३ हजार लिटर क्षमतेचे तर जिल्हा रुग्णालयातदेखील दहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट सज्ज करण्यात आले आहेत. त्याशिवाय शेकडो जम्बो सिलिंडर्स दररोज रुग्णालयांना लागत आहेत. नाशिकला लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी पुणे जिल्ह्यातील चाकण आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे लिक्विड ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून दररोज मागवावा लागत आहे. तिथून ऑक्सिजनचा पुरवठा नाशिकच्या रिफिलिंग प्रकल्पाला होता. मात्र या बाहेरच्या कंपन्यांकडेच दररोज ऑक्सिजनसाठी किमान १२ ते १५ तास प्रतीक्षा असते. त्यात एका टँकरला यायला आठ तास लागत असल्याने ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यात सातत्य उरलेले नाही . त्यात पुरवठादाराकडे केवळ दोनच ऑक्सिजन टँकर उपलब्ध असल्याने थोडा जरी विलंब झाला तरी नाशिक शहरातील ऑक्सिजन पुरवठ्याची सेवा कोलमडून पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अजून एक टँकर उपलब्ध करून दिल्यास या सेवेत बऱ्यापैकी सातत्य येऊ शकणार आहे.

इन्फो

उद्योगांच्या ऑक्सिजनबाबत निर्णयाची गरज

जिल्ह्यात ऑक्सिजनचे आठ उत्पादक असून, त्यातील तीन इंडस्ट्रियल उत्पादक तर अन्य पाच जण रिफीलर आहेत. तसेच जिल्ह्यातील सुमारे सव्वादोनशे कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी ऑक्सिजनची गरज लागते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत या कंपन्यांचा ऑक्सिजन पूर्णपणे बंद करून तो ऑक्सिजन रुग्णालयांना पुरवठा करण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Oxygen problem worsens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.