दोन रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:34+5:302021-05-09T04:15:34+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वेगाने वाढलीच, शिवाय गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करायचे असल्याने महापालिकेबरोबरच शासकीय रुग्णालये ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वेगाने वाढलीच, शिवाय गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करायचे असल्याने महापालिकेबरोबरच शासकीय रुग्णालये कमी पडली. शिवाय ऑक्सिजन हा सर्वाधिक अडचणीचा मुद्दा पुढे आला. रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळणे कठीण झाले हेाते. ऑक्सिजन संपत आल्याने ऐनवेळी रुग्णांना स्थलांतराचे प्रसंग देखील घडले तसेच काहींना तर ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णवाहिकेत बसून भ्रमंती करण्याची वेळ आली. ऑक्सिजनचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आता हवेतून ऑक्सिजन काढण्याचा प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू करण्यात आली. त्यातच तिसऱ्या टप्प्यातील संभाव्य कोरोनाची लाट अधिक गंभीर असण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे महापालिकेने आता कोणताही धोका न पत्करता स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार चार ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे नियोजन असले तरी पहिल्या टप्प्यात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय तसेच नवीन बिटकेा रुग्णालयात देखील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
महापालिकेने शनिवारी (दि.८) प्लांट उभारणीसाठी निविदा मागवल्या असून १३ तारखेला तांत्रिक बिड उघडले जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होणार असली तरी दोन महिन्यांत नवीन प्रकल्प उभारण्याची तयारी आहे.
इन्फो...
महापालिकेने पाचशे जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता असलेले प्रकल्प तयार करण्याची तयारी केली आहे. प्रकल्प उभारणी तसेच देखभाल दुरुस्ती आणि संचलन करण्यासाठी एका प्रकल्पाची किंमत सुमारे आठ कोटी असणार आहे. एकूण दोन प्रकल्पांची किंमत पंधरा ते सोळा कोटी रुपये असणार आहे.