आयएसपीकडून सिन्नर रुग्णालयात ऑक्सिजन युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:15 AM2021-04-28T04:15:39+5:302021-04-28T04:15:39+5:30
लवकरच हे युनिट उभारण्यात येणार असून, यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे ...
लवकरच हे युनिट उभारण्यात येणार असून, यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
गेल्या दोन महिन्यांपासून सिन्नर तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे त्यामुळे खासगी, तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. रुग्णालयातील उपलब्ध बेड आणि येणारे रुग्ण यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याने, रुग्णालय प्रशासन मेटाकुटीला आले आहेत. अशातच ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या अल्प असल्याने, बाधित रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात अधिकचे ऑक्सिजन युनिट उभारावेत, यासाठी तालुक्यातील नागरिकांनी खासदार गोडसे यांची भेट घेऊन मागणी केली होती.
इन्फो
प्रेस व्यवस्थापनाकडून दखल
गोडसे यांनी इंडियन सिक्युरिटी प्रेस कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या प्रेसच्या सीएसआर फंडातून सिन्नरसह परिसरातील रुग्णांसाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात स्वनिर्मित ऑक्सिजन युनिट उभारणीची आग्रही मागणी केली. त्याची दखल घेऊन प्रेस प्रशासनाने त्यांच्या सीएसआर फंडातून सिन्नर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन युनिट उभारणीसाठी तब्बल ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामी प्रेसमधील मजदूर संघाचे कामगार नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुद्रे यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.