जिल्ह्यात ४० मेट्रिक टन ऑक्सिजन वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 02:08 AM2021-04-10T02:08:56+5:302021-04-10T02:09:20+5:30
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी सिन्नर येथील स्वस्तिक एअर प्रॉडक्ट व निखिल गॅसेस या प्रत्येकी २० मेट्रिक टन उत्पादन क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्या अधिग्रहित करण्यात याव्यात, अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली असता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक : ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी सिन्नर येथील स्वस्तिक एअर प्रॉडक्ट व निखिल गॅसेस या प्रत्येकी २० मेट्रिक टन उत्पादन क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्या अधिग्रहित करण्यात याव्यात, अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली असता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांच्या टंचाईबाबत समीर भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, अन्न, औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त डॉ. माधुरी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते.
नाशिकमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्सिजन बेड्सची मागणी अधिक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता निर्माण होत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सिन्नर येथील स्वस्तिक एअर प्रॉडक्ट व निखिल गॅसेस या प्रत्येकी २० मेट्रिक टन उत्पादन क्षमता असलेल्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्या अधिग्रहित करण्यात याव्यात, अशी सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. तसेच कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर औषध उपलब्ध व्हावे यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
या वेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी संबंधित कंपन्या अधिग्रहित करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, रेमडेसिवीर औषध रुग्णांना उपलब्ध होण्यासाठी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच जिल्ह्यात अधिक ५० ड्युरा सिलिंडर खरेदी करण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
रेमडेसिवीर इंजेक्शनवर येणार रुग्णांचे नाव
n रेमडेसिवीर वितरणात गोंधळ झाल्याची बाब उघड झाल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनवर संबंधित रुग्णाचे नाव लिहिले जाणार असल्याची उपाययोजना केली जाणार असल्याचे सांगितले. यामुळे संबंधित रुग्णापर्यंतच इंजेक्शन पोहोचेल तसेच इतर कुणाला नाव असलेले इंजेक्शन मेडिकल्स किंवा रुग्णालयाकडून दिले गेल्यास तात्काळ लक्षात येऊ शकेल. यासाठी अशा प्रकारची उपाययोजना केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.