ओझर : दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान द्राक्ष हंगाम धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:06 PM2017-12-10T23:06:29+5:302017-12-10T23:47:23+5:30
द्राक्ष उत्पादनासाठी लागणाºया पोषक वातावरण व इतर बाबींचा विचार करता मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान बागायतदारांना सोसावे लागणार आहे.
ओझर : द्राक्ष उत्पादनासाठी लागणाºया पोषक वातावरण व इतर बाबींचा विचार करता मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान बागायतदारांना सोसावे लागणार आहे.
भारतीय द्राक्ष बाजारात नाशिक जिल्हा सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचे कारण म्हणजे येथील हवामान द्राक्षासाठी पोषक आहे. द्राक्षांना दोन प्रकारच्या बाजारपेठा उपलब्ध आहेत, एक जागतिक आणि दुसरी भारतीय. थंडीमुळे द्राक्षातील साखरेचे प्रमाण घटते. परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने द्राक्षमण्यांची फुगवण क्षमता व गोडी कमी झाल्याने उत्पादन घटले होते. त्यामुळे मागणी कमी झाली व उत्पन्नदेखील तीस टक्के घटले. राज्यातून द्राक्ष निर्यात हंगामाचा श्रीगणेशा करणारा पट्टा म्हणून कसमादे पट्ट्याची ओळख आहे. नोव्हेंबरमध्ये नॉन युरोप देशात चांगल्याप्रकारे निर्यात याच भागातील द्राक्षांनी केली. सर्वात जास्त उत्पन्न घेणारा भाग म्हणून या पट्ट्याचा लौकिक आहे; मात्र तेथील बागायतदार मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या बेमोसमी पावसामुळे डावणीचा प्रादुर्भाव होऊन फुलोºयाची गळ व कुज प्रचंड झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली. त्यातून सावरत असताना ऐन माल तयार होत असताना गेल्या आठवड्यात झालेला ओखीचा पाऊस जखमेवर मीठ चोळून गेला आहे. त्यामध्ये तयार झालेल्या द्राक्ष घडांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कसमादे पट्ट्यातील मुख्यत: सटाणा तालुक्यातील नुकसान हे निम्म्याहून अधिक आहे. नाशिक विभागात आॅक्टोबरमधील गोडबहार छाटणीदरम्यान झालेल्या बेमोसमी पावसाने डावणीचा प्रादुर्भाव होऊन घड जिरण्याचे प्रमाण अधिक झाले. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात घडनिर्मिती झाली असून, त्याचा थेट परिणाम गुणवत्तेवर झाला आहे. एकसारख्या मालाची कमतरता यंदा मोठ्या प्रमाणात दिसून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतीय बाजारातदेखील याचा थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. निर्यातीचा विचार केल्यास यंदा प्रमाणापेक्षा जास्त थंडी पडत असल्यामुळे निर्यातक्षम प्रत मिळवणे अवघड ठरत आहे. पाऊस व अति थंडीमुळे औषध फवारणीचा खर्च दुप्पट होत आहे. सर्व बाबींचा विचार करता यंदाचा द्राक्ष हंगाम बागायतदारांना गोड ठरण्याची शक्यता धूसर असल्याचे आजमितीस चित्र उभे राहिले आहे.