ओझर : यशवंतराव की ठाकरे; राजकीय चर्चा विमानतळाचे नामकरण वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:16 AM2018-04-07T01:16:25+5:302018-04-07T01:16:25+5:30
नाशिक : जानोरी विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांकडे केल्यामुळे विमानतळाचे नामकरण वादात सापडण्याची चिन्हे आहे.
नाशिक : जानोरी विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांकडे केल्यामुळे विमानतळाचे नामकरण वादात सापडण्याची चिन्हे असून, या विमानतळाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याबाबत विधिमंडळ अधिवेशनात चर्चा होऊन आमदार जयंत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्तावही सादर केल्यामुळे ठाकरे की चव्हाण, असा नवीन वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र पाठवून जानोरी येथील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. स्वत: गोडसे यांनी या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांना त्याची माहिती पुरविली आहे. तथापि, आघाडी सरकारच्या काळात शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या नवीन विमानतळाला स्व. चव्हाण यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अधिवेशनात राष्टÑवादीचे आमदार जयंत जाधव यांनी केली आहे. जाधव हे तालिका सभापती असताना कोल्हापूर विमातळाला छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्याचा ठराव विधिमंडळ पारित होऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तशी घोषणा केल्यावर जाधव यांनी जानोरीच्या विमानतळाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याची मागणी केली. त्यावर सरकारने सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. अधिवेशन संपल्यानंतर आमदार जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन सरकारने विधिमंडळात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, अशी विनंती केली आहे. त्यामुळे विमानतळ नामकरणाचा वाद नजीकच्या काळात पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.