ओझरला अखेर बारागाडे ओढले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 01:29 AM2021-12-10T01:29:27+5:302021-12-10T01:29:59+5:30
ओझर परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा यंदाही कोरोनाचा धोका लक्षात घेऊन इतिहासात दुसऱ्यांदा रद्द करण्यात आल्यानंतर प्रशासनाने घातलेल्या बंदीकडे कानाडोळा केला; परंतु नियमांचे पालन करीत चंपाषष्ठीनिमित्त बंदी असलेले बारागाडे अमाप उत्साहात ओढले गेले.
ओझर : परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा यंदाही कोरोनाचा धोका लक्षात घेऊन इतिहासात दुसऱ्यांदा रद्द करण्यात आल्यानंतर प्रशासनाने घातलेल्या बंदीकडे कानाडोळा केला; परंतु नियमांचे पालन करीत चंपाषष्ठीनिमित्त बंदी असलेले बारागाडे अमाप उत्साहात ओढले गेले.
भाविकांसाठी दर्शनास परवानगी प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी दूरपर्यंत रांगा लागल्या. यंदाही प्रशासनाने बारागाड्या ओढण्यास परवानगी न दिल्याने भाविकांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली;
परंतु स्थानिक ठिकाणी बारागाडे ठेवून मानकरी कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या चौकात गाडा पूजन केले. यात्रा कमिटीच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून भाविकांनी दर्शन पाच ते सहा फुटांचे अंतर ठेवून दर्शन देण्यासाठी सोडण्यात आले होते. मास्क लावणे, हात धुणे इतर सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, तर यावर्षी यात्रा कमिटीकडून मंदिराला विलोभनीय अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय असा जयघोष देत ओझरच्या खंडेराव महाराज यात्रेला सुरुवात झाली. दुपारच्या वेळी बाणगंगा नदीचे दर्शन करून अश्व पुढे मंदिराकडे नेण्यात आला. खंडेराव महाराजांचा जयघोष करत कै. विष्णुपंत पगारांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, वरचा माळीवाडा, मधला माळीवाडा, सिन्नरकर-निंबाळकर-चौधरी, पगार-गवळी, रास्कर, भडके, कदम व इतर बारा बलुतेदार शिंदे-चौधरी व अण्णा भडके यांचे बैलगाडी मल्हाररथ असे अश्वाचे धार्मिक पूजन केले.
यात्रा कमिटीच्या वतीने सर्व सदस्यांसह यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष धनंजय पगार, खजिनदार अशोक शेलार, उपाध्यक्ष युवराज शेळके, कार्याध्यक्ष राम कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अरुण गायकवाड, भूषण शिंदे, इम्रान खान, बालकदास बैरागी, एकनाथ हळदे, नितीन करंडे, कारभारी यादव, भास्कर पवार, अनुपम जाधव आदी उपस्थित होते.