ओझरखेड, वाघाड धरण ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 01:35 AM2022-07-13T01:35:53+5:302022-07-13T01:36:16+5:30
दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे व सोमवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे तालुक्यातील ओझरखेड व वाघाड ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत, तर इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे व सोमवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे तालुक्यातील ओझरखेड व वाघाड ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत, तर इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात घुसून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण धरण ८० टक्के भरले असून, करंजवण धरणातून २०,५८२ क्युसेक पाणी कादवा नदीपात्रात सोडण्यात आले. त्याप्रमाणे मांजरपाडा ( देवसाने) प्रकल्प परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुनेगाव धरणही ८० टक्के भरले असून, धरणातून ४००० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे ओझरखेंड धरण १०० टक्के भरले आहे. सोमवारपर्यंत मृतसाठ्यामध्ये असणारे तिसगाव धरण ८९ टक्के भरले आहे.
तालुक्यातील करंजवण, वाघाड, पुनेगाव, ओझरखेड तिसगाव या सर्व धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी पालखेड धरणामध्ये येत असल्यामुळे पालखेड धरणातून सकाळी ७ वाजता ३६,५०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग कादवा नदीपात्रात करण्यात आला.
करंजवण धरणातून २१ हजार क्युसेक पाणी कादवा नदीत सोडण्यात आल्यामुळे ओझे करंजवण येथील कादवा नदीवरील पूल रात्री दोन वाजेपासून पाण्याखाली गेला आहे. तसेच म्हेळुस्के लखमापूर येथील कादवा नदीवरील पूलही पाण्याखाली गेला आहे.
दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम परिसरातील ननाशी भागात सकाळपर्यंत विक्रमी ४०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तालुक्यात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली असून, मोठमोठे खड्डे पडले आहे.
वरखेडा-कादवा रस्त्यावरील पूल खचला
वरखेडा-कादवा रस्त्यावरील एका पुलावरून पुराचे पाणी जात हा पूल दोन्ही बाजूने खचला असून, मध्यभागी खड्डे पडले असून, हा पूल कधीही कोलमडत रस्ता बंद होण्याची चिन्हे आहेत. पुराचे पाणी येथील द्राक्ष बागांमध्ये, पिकांमध्ये घुसून नुकसान झाले आहे.
तालुक्यात मंगळवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत विक्रमी १९६ मिमी पाऊस पडला.
इन्फो
जिल्हाधिकाऱ्यांची पालखेड धरणास भेट
जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांनी पालखेड धरणास भेट देत पाहणी केली तसेच तहसीलदार पंकज पवार व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संभाव्य पूरस्थितीची माहिती घेत आढावा घेतला.