ओझरला दुकानांसमोर मद्यपींची पुन्हा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:31 PM2020-05-08T22:31:38+5:302020-05-09T00:07:01+5:30
ओझर : शासनाने मद्यविक्रीला पुन्हा सशर्त परवानगी देताच मद्यविक्रीच्या दुकानांसमोर भर उन्हात हातात फॉर्म घेऊन मद्यपींच्या रांगा लागल्या. त्यामुळे रस्त्यावर जत्राच भरल्याचे चित्र दिसून आले.
सुदर्शन सारडा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : शासनाने मद्यविक्रीला पुन्हा सशर्त परवानगी देताच मद्यविक्रीच्या दुकानांसमोर भर उन्हात हातात फॉर्म घेऊन मद्यपींच्या रांगा लागल्या. त्यामुळे रस्त्यावर जत्राच भरल्याचे चित्र दिसून आले.
गेल्या दीड एक महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे सर्वच उद्योगधंद्यांना ब्रेक लागला होता. त्यात सर्वात जास्त चर्चिला गेला तो म्हणजे मद्यविक्र ीच्या दुकानांचे टाळे कधी उघडणार? सरकारने एक दिवस ट्रायल करून पाहिल्यावर परिस्थिती हाताबाहेर गेली तर फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. परिणामी देर आए दुरु स्त आए म्हणत शासनाने पुन्हा मद्यविक्रीला परवानगी दिली. मद्यपींना मद्य विकत घेताना बँकेसारख्या स्लिपा पहिल्यांदाच भरून द्याव्या लागल्या. देशी विकत घेणाऱ्या वीरांना सावलीत आल्यावर आपण बँकेत तर नाहीना आलो असा होरा होत होता. तर यात तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगट सामील झाल्याने अनेक गावकऱ्यांना दोन्ही दुकानांकडे पाहून महामार्गावरील यात्रेची आठवण झाली. यात तळपत्या उन्हात कुणालाही चक्कर आली नाही तर कुणाचेही कुणाशी शब्दानेसुद्धा भांडण नाही. एरवी पेट्रोल भरताना, बँकेत पैसे काढताना आदी ठिकाणी कधीकधी नागरिक जे भांडण करतात त्यांनी यातून खरा बोध घेतला असणारच यात कुठलीही शंका नाही. सायंकाळी कट्ट्यावर एकच चर्चा रंगत आहे अर्थव्यवस्थेचे पुढे कसे होणार? त्यांना सदर रांगा व उलाढाल बघून उत्तर मिळालेले असेल हेदेखील तितकेच खरे. पोलीस, उत्पादन शुल्क विभागदेखील इतक्या गर्दीपुढे पुरते हतबल झाले होते. आधीच पोलिसांची संख्या कमी, त्यात काही जण मालेगावी बंदोबस्ताला तर उरलेल्यांमध्ये लाख लोकांना सांभाळायचे म्हटल्यास ते पण कुठे कुठे लक्ष देणार हे ध्यानात ठेवत मद्यपींनी शिस्तीचा एक वेगळा पायंडा पाडला.
------
‘जनधन’चे पैसे घेण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी
एकीकडे मद्यपींची गर्दी तर दुसरीकडे पंतप्रधान जनधनखात्यात दुसºया महिन्याचे पाचशे रु पये जमा झाल्याने ते काढण्यासाठी गोरगरीब महिलांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. विशेष म्हणजे मद्यपींना मद्य घेताना फॉर्म भरावा लागत होता तर इकडे महिलांनादेखील स्लिप भरून अंगठ्याचा ठसा देऊन पैसे मिळत होते. दोन्ही रांगा समांतर असताना रांगेतल्या महिलांचे तोंड गावाकडे, तर पुरुषांचे तोंड महामार्गाकडे असल्याने त्यातील एकजण सरकारला महसूलरूपी पैसे देत होता, तर दुसरीकडे संसाराची चिंता होती.