ओझरला जनता कर्फ्यू यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 12:44 PM2020-07-12T12:44:16+5:302020-07-12T12:45:05+5:30
ओझर : परिसरात बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ‘मी घरातच थांबणार आणि कोरोनाची साखळी तोडणार’ असा निश्चय करीत ओझरमधील नागरिकांनी ओझर ग्रामपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन दिवसीय जनता कर्फ्यू यशस्वी केला. त्यामुळे ओझरमधील सर्व दुकाने बंद होते व रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
ओझरसह परिसरात आतापर्यंत आठवडाभरात ३७ कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. वाढत्या कोरोनाबाधित रु ग्ण संख्येमुळे ओझर शहर व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून शहर व परिसरात ११ ते १२ जुलै पर्यत दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन ओझरकर नागरिक व ग्रामपालिकेकडून करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शंभर टक्के प्रतिसाद दिला. या बंद काळात नागरिक घरातच थांबले तसेच व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय ,दुकाने बंद ठेवली त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
जगभरात थैमान घालणाºया कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओझर ग्रामपालिका, प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग यांच्यासह ओझरकर नागरिक तीन महिन्यापासून प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या माध्यमातून कोरोनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतू बाहेरगावाहून येणा-या व्यक्ती, लग्न सोहळ्यास ,अंत्यविधीस उपस्थिती लावणाऱ्यांमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे ओझरसह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे . या पार्श्वभूमीवर ग्रामपालिकेत झालेल्या ओझर व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ११ ते १२ जुलै दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ओझरसह परिसरात तीन दिवसातआतापर्यंत १९ जणांचाअहवाल पॉझिटिव्ह आला असून २२ अहवाल प्रलंबित आहेत.