ओझरला जपानुष्ठान सोहळ्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:14 AM2018-03-28T00:14:10+5:302018-03-28T00:14:10+5:30
येथील जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज आश्रमात आठ दिवसांपासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’च्या जयघोषात सांगता करण्यात आली.
ओझर टाउनशिप : येथील जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज आश्रमात आठ दिवसांपासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’च्या जयघोषात सांगता करण्यात आली. महामंडलेश्वर समर्थ सद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ओझर येथील आश्रमात जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, हस्तलिखित जपसाधना, रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, आरती, प्रवचन, सत्संग, एकनाथी भागवत वाचन, १०८ शिवलिंग तसेच १०८ गोमुख स्थापना, श्री गणेश, हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा आदी कार्यक्रम झाले. जपानुष्ठानला बसणाऱ्या भाविकांनी आयुष्यभर व्यसनमुक्त आणि शाकाहारी राहण्याचा संकल्प केला. यावेळी साधकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आठ दिवस केवळ हवेवर जपानुष्ठान करणाºया साधकास स्वामी शांतिगिरी महाराज यांनी तीर्थ देऊन जपानुष्ठानाची सांगता केली. आठ दिवस केवळ पाणी आणि दुधावर जपानुष्ठान करणाºया साधकांच्याही व्रताची सांगता रामानंद महाराज यांच्या हस्ते तीर्थ देऊन करण्यात आली. कार्यक्रमाच्या सांगतेनिमित्त ओझर परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत जपानुष्ठानास बसलेल्या साधकांसह कलशाधारी महिला, कुमारिका सहभागी झाल्या होत्या. सत्संग सोहळ्याप्रसंगी ब्रह्मचारी रामानंदी महाराज यांनी, जपानुष्ठान आजच्या काळाची गरज असून, अनेक प्रकारचे संस्कार जपानुष्ठानाच्या माध्यमातून केले जातात. मौनव्रतामुळे आत्मिक शक्ती वाढून आध्यात्मिक ऊर्जा मिळते. जीवनात प्रत्येकाने सद्गुरु करावे आणि त्यांच्या आदेशाचे पालन करावे. प्रत्येकाने वर्षातून एकतरी जपानुष्ठान करावे, असेही त्यांनी सांगितले.