ओझरला शिवलिंगांवर महाअभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:36 PM2020-02-22T22:36:48+5:302020-02-23T00:26:53+5:30
ओझर येथील जनशांतिधाममध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. विविध देवदेवतांचे पूजन करण्यात आले.
ओझर टाउनशिप : ओझर येथील जनशांतिधाममध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. विविध देवदेवतांचे पूजन करण्यात आले.
शिवनामाचा निरंतर जप केल्याने यशस्वी संसार होतो. पती आणि पत्नीने एकमेकांचा आदर राखत भगवान शिवाची भक्ती करावी आणि आपल्या जीवनाचे सार्थक करावे. मुलांना बालवयातच योग्य संस्कार द्यावे. प्रत्येक जिवात शिव आहे. असा भाव ठेवून त्यांच्याबद्दल आदरभाव ठेवावा. ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ श्रमली. शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे इतके महत्त्व भगवान शिवाच्या नामाचे आहे. म्हणूनच शिवभक्ती केल्याशिवाय मनुष्य जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. असे प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर श्रीसंत सद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांनी केले.
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ओझर येथील देवभूमी जनशांतिधाम येथे महाशिवरात्रीनिमित्त महाभिषेक-पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यावेळी शेकडो ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात आणि शेकडो लक्ष्मी-नारायण जोडप्यांच्या हस्ते येथील ११७ शिवलिंगांसह जनशांतिधामातील देवी-देवतांच्या मूर्तींचा महाभिषेक-पूजन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचा प्रारंभ चांदीच्या रथातील लक्षवेधी पालखी मिरवणुकीने करण्यात आला. यानंतर तब्बल दीड महिन्यापासून आश्रमातील अंतर्गत विकासासाठी बंद असलेले जनशांतिधामाचे महाद्वार श्रीसंत सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजेनंतर उघडण्यात आले. यावेळी शेकडो ब्रह्मवृंदांच्या मंगलमय मंत्रघोषात शेकडो लक्ष्मी-नारायण जोडप्यांच्या हस्ते भगवान बाणेश्वर महादेवासह अष्टमूर्ती शंकर, १०८ शिवलिंग, १०८ गोमुख, तसेच आश्रमात स्थापित शेकडो देवी-देवतांचे अभिषेक-पूजन झाले. या संपूर्ण सोहळ्याचे पौरोहित्य विलासगुरु कुलकर्णी यांसह त्यांचे शेकडो सहकारी ब्रह्मवृंद यांनी केले. सोहळ्यास आलेल्या भाविकांना ११ क्विंटल साबुदाण्याच्या खिचडीचे आणि शेकडो किलो फळांचे वाटप करण्यात आले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रमुख सेवेकऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी सत्संग, प्रवचन, नामजप, नित्यनियम विधी, महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जनशांतिधामाचे महाद्वार महाशिवरात्रीच्या पर्वकालावर दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत भाविकांनी अलोट गर्दी यावेळी केली. सर्वप्रथम रामेश्वर, कन्याकुमारी, नर्मदा, गोदावरी यांसह विविध तीर्थक्षेत्रांहून आणलेल्या तीर्थाने भगवान बाणेश्वर महादेवासह ११७ शिवलिंगास समर्थ सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते महाजलाभिषेक झाला.