अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:39 AM2017-08-24T00:39:01+5:302017-08-24T00:39:06+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला आर्थिक स्थिरता प्राप्त होत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या नरेंद्र दराडे यांना बदलण्यासाठी काही संचालकांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. येत्या रविवारी (दि.२७) जिल्हा बॅँकेच्या एका संचालकाचा वाढदिवस असून, या वाढदिवसाला सर्व संचालकांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे समजते. याच स्नेहभोजनादरम्यान अध्यक्ष बदलाची चर्चा होणार आहे.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला आर्थिक स्थिरता प्राप्त होत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या नरेंद्र दराडे यांना बदलण्यासाठी काही संचालकांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. येत्या रविवारी (दि.२७) जिल्हा बॅँकेच्या एका संचालकाचा वाढदिवस असून, या वाढदिवसाला सर्व संचालकांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे समजते. याच स्नेहभोजनादरम्यान अध्यक्ष बदलाची चर्चा होणार आहे. जून २०१५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र दराडे तर उपाध्यक्षपदी सुहास कांदे यांची निवड झाली. निवडीप्रसंगी काही संचालकांनी ही निवड एक वर्षासाठी असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. तर त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या सतीश खरे यांनी ही निवड सहकार कायद्यानुसार पाच वर्षांसाठी असल्याचे सांगितले होते. मात्र संचालकांनी एकमत करून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड केली असून, वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा सर्वांच्या सहमतीने नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याचे संचालकांचे म्हणणे होते. मध्यंतरी नाशिकला एका हॉटेलमध्ये २१ पैकी १६ संचालकांची बैठक होऊन त्यात अध्यक्ष बदलाचा निर्णयही झाला होता. मात्र नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती खालावल्याने कोणी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा विषय काढला नाही.
जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे अध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला होता. आता भाजपाचा संचालक अध्यक्षपदी निवडून आणण्यासाठी भाजपाच्या संचालकांनी चंग बांधल्याची चर्चा आहे. भाजपाच्या सहापैकी दोन संचालकांनी यापूर्वीच जिल्हा बॅँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. येत्या रविवारी जिल्हा बॅँकेच्या एका संचालकाचा वाढदिवस असून, त्याचदिवशी अध्यक्ष पदाबाबत चर्चा होणार आहे. सहमतीने अध्यक्ष पदाचा राजीनामा न दिल्यास अविश्वास आणण्यासाठी काही संचालकांनी व्यूहरचना आखल्याचे कळते.