विकासकामांचा वेग मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 09:21 PM2020-06-15T21:21:40+5:302020-06-16T00:01:47+5:30
सिन्नर :दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या सिन्नर नगर परिषदेच्या करवसुलीत पहिल्यांदाच विपरीत परिणाम झाला असून, लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर झाला आहे. परिणामी विकासकामांचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र गेल्या तीन महिन्यांत दिसून येत आहे.
सिन्नर : (शैलेश कर्पे ) दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या सिन्नर नगर परिषदेच्या करवसुलीत पहिल्यांदाच विपरीत परिणाम झाला असून, लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर झाला आहे. परिणामी विकासकामांचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र गेल्या तीन महिन्यांत दिसून येत आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा फटका नगर परिषदेस सोसावा लागत आहे. २०१९-२० साली नगर परिषदेस विविध करापोटी सुमारे पाच कोटी रुपये वसुली अपेक्षित होती. मात्र मार्चअखेरीस केवळ दीड कोटी रुपयांची वसुली झाली आहे. नगर परिषदेच्या विविध विकासकामांना मार्च एण्डला ४ ते ५ कोटी आणखी निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे हा निधी मिळू न शकल्याने विकासकामे काहीशी धिम्या गतीने सुरू आहेत.
नगर परिषदेस बांधकाम व बाजार टॅक्स व विविध येणारा करही कमी मिळाला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून आर्थिक गरजा भागव्यावा लागणार आहेत. करसंकलन वाढून विकासकामांचा वेग वाढवावा लागणार आहे.
सन २०१९-२० साली मार्चअखेरीस घरपट्टी केवळ २९ टक्के तर पाणीपट्टी १८ टक्के वसूल झाली आहे. नगर परिषदेचे अनेक गाळे असून, त्यांचे गाळेभाडेही थकल्याचे चित्र आहे. पूर्वी मंजूर असलेल्या कामांना विकासनिधी मिळाला असला तरी नवीन कामांना अद्यापी निधी किंवा मंजुरी मिळाली नाही. काही कामे मंजूर आहेत मात्र राज्याच्या अर्थकारणावर कोरोनाचा परिणाम झाल्याचे
त्याचा आपोआप परिणाम नगर परिषदेच्या अर्थकारणावर झाल्याचे चित्र आहे.
नगर परिषदेने शिवाजीनगर व अन्य काही उपनगरात रस्ते व बंदिस्त गटारींची कामे मार्गी लावल्याचेही दिसून आले. आहे तो निधी नगर परिषदेने विकासकामांना वापरून विकासाचा गाडा पूर्णपणे थांबू दिला नसला तरी काही प्रमाणात विकासकामांचा वेग मंदावल्याचेही दिसून आले.
----------------------
कर्मचाऱ्यांचे पगार मिळाले;
पण थोडासा उशीर
नगर परिषदेत ९८ कर्मचारी कार्यरत आहे. गेल्या तीन महिन्यात लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार झाले. मात्र त्यास काहीसा उशिरा झाला. उशिराने अनुदान येत असल्याने पगारलाही उशीर झाला. नगर परिषदेत विविध ठेकेदाराचे सुमारे १०० कर्मचारी कार्यरत असून, त्यांचे पगार ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
-----------------------
आठवडे बाजार वसुली थांबली
४मार्चअखेरपर्यंत आठवडे बाजार वसुलीचा लिलाव देण्यात आला होता. मात्र १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१पर्यंत बाजार वसुलीचा लिलाव होेऊ शकला नाही. बाजार लिलावाचे टेंडर झाले हाते. मात्र ते रद्द करण्यात आले. तीन महिन्यांपासून आठवडे बाजार वसुली बंद असल्याने नगर परिषदेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे.
नगर परिषदेच्या आरोग्य
व स्वच्छतेवर खर्च वाढला
४नगर परिषदेच्या करवसुलीवर कोरोनामुळे विपरीत परिणाम झाला असताना दुसरीकडे आरोग्य व स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात खर्च वाढला आहे. सफाई कामगार, पाणीपुरवठा, औषध फवारणी व खरेदी यावर जास्त प्रमाणात खर्च होत आहे. दरवर्षी २५ ते ३० लाख रुपयांचा विकासशुल्क निधी जमा होत असते. मात्र यावर्षी त्यावर परिणाम झाला आहे.
-----------------------
कोरोनाच्या काळात विकासकामांवर फारसा परिणाम झाला नाही. जी कामे मंजूर आहेत व ज्यांना निधी आला आहे ती कामे काहीशा उशिरानेही का होईना पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.
-संजय केदार, मुख्याधिकारी,
सिन्नर नगर परिषद
---------------------------
दोन महिने लॉकडाऊन राहिल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम कर, नवीन लेआऊट कर मिळणे बंद झाले. नगर परिषदेत पैसे उपलब्ध नाही. त्यामुळे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून चौदाव्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा, आरोग्य व विविध विकासकामांना खर्चासाठी परवानगी मिळण्यासाठी साकडे घातले आहे.
- किरण डगळे, नगराध्यक्ष,
सिन्नर नगर परिषद