सार्वजनिक गणेश मंडळांच्या तयारीला वेग
By admin | Published: September 2, 2016 12:44 AM2016-09-02T00:44:08+5:302016-09-02T00:44:42+5:30
फुलली बाजारपेठ : मंडप उभारणीला प्रारंभ; घरगुती उत्सवासाठीही उत्साह
नाशिकरोड : परिसरामध्ये सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तयारीला वेग आला असून, मंडप उभारणीची कामे सुरू झाली आहेत, तर घरगुती सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ फुलली आहे.
नाशिकरोड, जेलरोड, उपनगरे व आजूबाजूच्या ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘श्रीं’च्या आगमनानिमित्त सर्वत्र लगबग दिसत आहे. बहुतांश मंडळाचे मंडप उभारण्याचे कामं पूर्ण झाले असून, देखावे उभारणीचे काम सुरू केले आहे. तर काही मंडळांचे मंडप उभारणी, रस्त्यावर कमानी, विद्युत रोषणाई लावण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक सार्वजनिक मंडळाने आपापल्या भागात सजावटीचे काम सुरू केले आहे.
बाजारांमध्ये विक्रीस आलेल्या गणरायांची मूर्ती बुकिंगसाठी भाविकांची सहपरिवार गर्दी होऊ लागली आहे. तर घरगुती, सोसायटी, कॉलन्यांमधील छोट्या मंडळाच्या देखाव्यांची साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. विविध रंगांच्या विद्युत रोषणाईच्या माळा, दिवे, प्लास्टिक फुलांचे तोरण, माळा, थर्माकोलचे मंदिर, महिरप, नवनवीन ध्वनीगीतांच्या सीडी बाजारात दाखल झाल्या
आहेत. यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. (प्रतिनिधी)