लसीकरणाची कासवगती, प्रत्येकाला दोन्ही डाेस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:18+5:302021-07-29T04:14:18+5:30
नाशिक : जिल्ह्याला आठवडाभरात कसेबसे ३० ते ३५ हजार लसींचे डोस मिळत आहेत. कोरोना लसीकरणाचा वेग असाच सुरू ...
नाशिक : जिल्ह्याला आठवडाभरात कसेबसे ३० ते ३५ हजार लसींचे डोस मिळत आहेत. कोरोना लसीकरणाचा वेग असाच सुरू राहिला किंवा अगदी थोड्या प्रमाणात जरी वाढला तरी किमान दोन वर्षांहून अधिक कालावधी हा कोरोना लसीकरणालाच लागणार आहे.
कोरोना घराघरात शिरण्याची भीती निर्माण झाली तेव्हा लसीकरणासाठी सर्व केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोनाची लागण होईल याचा विचार न करता नागरिकांनी लस मिळविण्याचा प्रयत्न केला, तरीही अनेकांना लस मिळालीच नाही. सध्या जिल्ह्यात केवळ ९ टक्के नागरिकांचेच दोन डोस झाले आहेत. सुमारे ६४ लाख लोकसंख्येपैकी अद्याप ९१ टक्के जनतेला लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. लसीकरणाची गती अशीच राहिली तर प्रत्येकाला लसीचे दोन डोस मिळायला तीन वर्षेही पुरणार नाहीत, तर लस पुरवठा मुबलक प्रमाणात झाला तरी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. राज्याकडे कोरोना लसीचे पुरेसे डोस नाहीत ही वस्तुस्थिती सातत्याने उघड होत आहे. त्यामुळेच कधी ज्येष्ठांना लस, कधी केवळ युवांना लस, तर कधी लसीकरण ठप्प, अशा प्रकारे लसीकरणाचे कामकाज संथ गतीने सुरू आहे. त्याच वेगाने कोरोना लसीकरण सुरू राहिले, तर प्रत्येक नागरिक ‘लसवंत’ होण्यास लागणाऱ्या कालावधीची कल्पनाही करवत नाही.
इन्फो
१८ वर्षांखालील लसीकरण म्हणजे स्वप्नरंजनच!
शेवटच्या टप्प्यात १८ वर्षांखालील लोकसंख्येच्या लसीकरणाचे शासनाचे नियोजन आहे; पण ते अद्याप कागदावरच आहे. या वयोगटात जिल्ह्यात तब्बल २० लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी कोणती लस वापरणार, किती डोस द्यावे लागतील, किती दिवसांच्या अंतराने द्यावे लागतील, याचे कोणतेही नियोजन शासनाकडून अद्याप आलेले नाही. १८ वर्षांवरील लोकसंख्येच्या लसीकरणाचा ताळमेळ अद्याप नसताना त्याखालील लाभार्थींचे लसीकरण म्हणजे फक्त स्वप्नरंजनच ठरणार आहे.
बॉक्स
लसीकरण केंद्रांच्या संख्येत दररोज बदल
जानेवारीत पाच केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. पुरवठा वाढला तेव्हा केंद्रेही टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. २६७ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. लसींचा तुटवडा होऊ लागला तेव्हा मात्र अनेक केंद्रे बंद पडली. कधीकधी फक्त २०, तर कधीकधी ५ केंद्रांवरच लसीकरण सुरू असते. आठवड्यातून एकदा २५ ते ३५ हजार डोस येतात. पाच दिवसांत संपूनही जातात. अशावेळी सर्व केंद्रांवरील लसीकरण थांबण्याचे प्रकारदेखील घडतात.
कोट
महाराष्ट्राने दररोज काही लाख लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध होत नसेल तर शासन आणि प्रशासनही कुठून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करून देणार, हा प्रश्नच आहे.
संजय ननावरे, नागरिक
-----------------------------------
१८ वर्षांवरील सर्व सज्ञानांच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. मात्र, काही प्रमाणात कोविड योद्ध्यांनाच लस देणे अजून बाकी असल्याने युवा वयोगटातील बहुतांश नागरिकांची पहिली लसदेखील बाकी आहे.
नीलेश शहाणे, नागरिक
कोट
आठवड्याला किमान एक लाख लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे. मात्र, मुबलक प्रमाणात लस मिळत नाही. त्यात मागणी प्रचंड असल्याने मिळालेली लस काही दिवसांतच संपते. पुरेसा पुरवठा झाला तर वेगाने लसीकरण करण्याची आमची तयारी आहे. सध्याची गती पाहता संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण कधी पूर्ण होईल याचा अंदाज सांगता येत नाही.
डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
----------------------------