कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजना बंद

By Admin | Published: August 27, 2016 09:06 PM2016-08-27T21:06:47+5:302016-08-27T21:07:06+5:30

कृत्रिम पाणीटंचाई : वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित; समन्वय समिती नसल्याने अडथळा

Pachgaon water supply scheme with Kankori is closed | कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजना बंद

कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजना बंद

googlenewsNext

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नांदूरशिंगोटे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन व पाणीपुरवठा समिती यांच्यात समन्वय नसल्याने नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून टंचाईचा सामना करावा लागत आहे.
नांदूरशिंगोटे गावाला नळ पाणीपुरवठा योजनेव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याने महिलांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा समितीस अनेकदा वीजबिल भरण्यासंदर्भात तगादा लावल्यानंतरही प्रशासन व समितीकडून वीजबिल न भरल्याने नाइलाजास्तव वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे.
कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे नांदूरशिंगोटे, मानोरी, कणकोरी, मऱ्हळ बुद्रूक आणि मऱ्हळ खुर्द आदि गावांना भोजापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक गावाला दर महिन्याची पाणीपट्टीही ठरवून देण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पाचही गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणीपुरवठा समिती, प्रशासन, पाचही गावांचे पदाधिकारी यांच्यात नेहमीच समन्वय नसल्याने पाणीपुरवठा योजना विस्कळीत असते. महिन्याकाठी योजनेला सव्वा लाखाच्या आसपास देखभाल, दुरुस्ती व वीजबिलाचा खर्च येत आहे. परंतु, नांदूरशिंगोटे व मानोरी ग्रामपंचायत वगळता उर्वरित गावांकडून पाहिजे त्या प्रमाणात पाणीपट्टी वसुलीची रक्कम दिली जात नसल्याने योजना चालविताना कसरत करावी लागत आहे. भोजापूर धरणात ओव्हरफ्लो झाले असतानाही पाचही गावांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
पाचगाव पाणीपुरवठा योजनेवर भोजापूर धरणावरील उद्भव विहिरीच्या विद्युतपंपाची सुमारे तीन लाख २२ हजार रुपये थकबाकी आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी नवीन पाणीपुरवठा समितीची स्थापना करण्यात आली. सदर निवड कागदोपत्री झाली असून, समितीची बैठक झालेली नाही. सचिवपदाची जबाबदारी मानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे आहे. परंतु यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे दोन महिन्यांत थकबाकीमुळे तीन वेळा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
मंगळवारी (दि. २३) वीज वितरण कंपनीने भोजापूर धरणावरील वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पाच दिवसांपासून योजना बंद असल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे. याबाबत पाणीपुरवठा समिती व प्रशासन यांच्याकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
भोजापूर धरणाव्यतिरिक्त नांदूरशिंगोटे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कोठेच स्त्रोत नसल्याने पाणीपुरवठा समिती व प्रशासनाने तत्काळ बैठक घेऊन वीजबिल भरण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Pachgaon water supply scheme with Kankori is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.