भारतीय जुमला पक्षाचे ‘गाजर’ शेतीला पॅकेज
By admin | Published: February 14, 2017 01:07 AM2017-02-14T01:07:54+5:302017-02-14T01:08:05+5:30
आदित्य ठाकरे यांची भाजपावर टीका
नाशिक : निवडणुकीचा माहोल सुरू झाल्याने भारतीय जुमला पक्षाकडून ‘गाजर’ शेतीला प्राधान्याने पॅकेज देण्याच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी या जुमला पक्षाने पॅकेज दिले, तेथे तेथे हा पक्ष तोंडघशी पडला आहे, अशी टीका युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपाचे नाव न घेता केली आहे. सिडको येथील पवननगर येथे सिडको विभागातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही टीकेची झोड उठविली. ते म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षाने नाशिक शहरभर विकासकामे केल्याची फलकबाजी केली आहे. जर त्यांनी खरोखरच विकासाची कामे केली असती तर इतक्या मोठ्या प्रमाणात या पक्षाला गळती कशी लागली, असा सवाल करून त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की, सत्तेतील नगरसेवकांनी पक्ष सोडून विरोधी पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेचा जाहीरनामा नसून वचननामा आहे. वचन म्हणजे जे तुम्हाला दिले ते पूर्ण करणार, असे सांगून ठाकरे यांनी मुंबई व औरंगाबाद महापालिकेत आजवर केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. नाशिक वाचवायचे असेल तर ‘जुमला’ पक्षाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन करून आदित्य ठाकरे यांनी मनपात शिवसेनेची सत्ता आल्यास सिडकोवासीयांच्या जिव्हाळ्याच्या पेलिकन पार्कचे काम अवघ्या सहा महिन्यांत सुरू केले जाईल, असे सांगितले. काही पक्षांनी निवडणुकीचे जाहीरनामे स्टॅम्प पेपरवर केले आहेत. नवीन नोटांचा रंग ज्या पद्धतीने नोटा घासल्यावर जातो, तसेच या स्टॅम्प पेपरवर दिलेल्या घोषणांचाही रंग जाईल, हे लक्षात घेऊन नाशिककरांनी केंद्रातील सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधातील राग मोठ्याने आळवावा जेणेकरून दिल्लीपर्यंत त्याचा आवाज पोहोचेल व त्यांचा मनमानी कारभार थांबेल, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना पक्ष प्रवक्ता आदेश बांदेकर यांनी पारदर्शकता म्हणजे काय, असा सवाल करून जे स्पष्ट व स्वच्छपणे दिसते ते पारदर्शी आहे किंवा काचेतूनही जे दिसते ते पारदर्शी असेल तर अशा पारदर्शी कारभारासाठी शिवसेना हेच एकमेव नाव असल्याचा दावा केला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर यांची भाषणे झाले. व्यासपीठावर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व शहर महिला आघाडी प्रमुख श्यामला दीक्षित यांच्यासह सिडकोतील सेनेचे सर्व उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गाजर विकत घेऊ नका, फुकटात मिळतील
नाशिक महापालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ येत्या १८ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांनी या सभेच्या दिवशी नाशिककरांनी गाजर खरेदी करू नयेत, ते त्यांना मोफत वाटप केले जातील, असे सांगून टीका केली.