शंभर पोस्टमनकडून ३ हजार राख्यांची पाकिटे घरपोहोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:13+5:302021-08-23T04:17:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर: भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाला बहिणीने भाऊरायाला पोस्टाने पाठविलेल्या राख्या रक्षाबंधनाच्या सणाला मिळाव्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर: भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाला बहिणीने भाऊरायाला पोस्टाने पाठविलेल्या राख्या रक्षाबंधनाच्या सणाला मिळाव्यात यासाठी भारतीय डाक विभागाने नाशिक येथील डाक कार्यालयातील टपाल बटवडा रविवारी सुटीच्या दिवशीही सुरू ठेवला. रविवारी सुटी असताना बहिणीचे रेशमी धागे भावाला घरपोहोच पोहोचविण्यासाठी नाशिक विभागातील १०० पोस्टमन सुटीच्या दिवशीही धावले.
नाशिक विभागातील ४३ पोस्ट कार्यालयातील सुमारे १०० पोस्टमनने बहिणीच्या राख्यांची पाकिटे भावाच्या घरी पोहोच करून दीडशे वर्षांपासूनही अधिक काळ सेवेचे ऋणानुबंधाचे नाते अधिक घट्ट केले. यावर्षी रक्षाबंधन नेमके रविवारी सुटीच्या दिवशी आले. देशभरातील लाखो बहिणी भावापासून शेकडो किमी दूर असल्याने रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी येऊ शकत नाही. तथापि, न चुकता भावाला राख्या पाठविण्याच्या परंपरेत बहिणीचा कधीही खंड पडत नाही. कोरोनाच्या काळातही डाकसेवा बंद नव्हती. मात्र सुटीच्या दिवशी टपाल बटवडा बंद राहिला तर बहिणीने पाठविलेल्या राख्या रविवारी रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला मिळू शकणार नाही हे जाणून नाशिक विभागाचे वरिष्ठ प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी रविवारी राख्यांच्या टपाल बटवडा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. नाशिक विभागातील सर्व पोस्टमनने त्यास प्रतिसाद देऊन बहिणीच्या राख्या पोहोच करण्याचा निर्धार केला.
नाशिक विभागातील ४३ पोस्ट कार्यालये रविवारी रक्षाबंधनाच्या दिवशी उघडली. सुमारे १०० पोस्टमन कामावर हजर झाले. छाननीनंतर पोस्टमन बहिणींच्या राख्यांचे पाकिटे घेऊन घरोघर गेली आणि बहिणीने पाठविलेल्या राख्या त्यांच्या भावांना पोहोच केल्या. रविवारी सुटीच्या दिवशीही पोस्टमन दारात येऊन आपल्या लाडक्या बहिणीने पाठविलेल्या राख्यांचे पाकीट दिल्यानंतर भावाच्या चेहऱ्यावर आलेला आनंद डाक विभागाच्या पोस्टमनाला समाधान देऊन गेला.
चौैकट-
बहिणीला भावासाठी राख्या पाठविण्यासाठी डाक विभागाने विशेष पाकिटे तयार केली होती. पावसात सदर पाकीट भिजणार नाही याचीही काळजी घेण्यात आली होती. नाशिक विभागातील पोस्टमन त्यांच्या रक्षाबंधनाचा सण बाजूला ठेवून कामावर आले. घरोघर जाऊन राख्या वाटल्या याचे समाधान वाटते. सुमारे अडीच ते तीन हजार राख्यांच्या पाकिटांचा बटवडा झाला.
- मोहन अहिरराव, वरिष्ठ प्रवर अधीक्षक, डाक विभाग नाशिक
चौकट-
रविवारी आम्हाला कामावर बोलावले. मात्र बहिणीच्या भावना भावापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला आनंद झाला. रविवारी पोस्टमन घरी आल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र बहिणीने पाठविलेले राखीचे पाकीट रक्षाबंधनाच्या दिवशी सुटी असूनही मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. महिला पोस्टमनला बहिणीच्या राख्या भावापर्यंत पोहोचविण्याचे भाग्यच लाभले.
- सारिका कर्पे (सोमवंशी), पोस्टमन, पंचवटी नाशिक
फोटो - २२ सारिका कर्पे
नाशिक येथे पंचवटी डाक कार्यालयाच्या पोस्टमन सारिका कर्पे (सोमवंशी) यांनी रविवारी सुटीच्या दिवशीही बहिणीने भावासाठी पाठविलेली राख्यांची पाकिटे घरपोहोच केल्याचे चित्र दिसून आले.
220821\22nsk_21_22082021_13.jpg
फोटो - २२सारीका कर्पे